नागपूर ः नागपूर शहरातील रस्त्यांची काही प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता असून, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे नागपूर महानगरपालिका व आयटीडीपीने (इन्स्टिट्यूट फॉर ट्रांसपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलीसी) सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, पायी चालणाऱ्यांसाठी अजनी चौक ते रहाटे चौक पर्यंतचा रस्ता सुरक्षित व सर्वोत्कृष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नागपूर महानगरपालिका आणि आयटीडीपी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जुलै २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘नागपूर अर्बन स्ट्रीट्स असेसमेंट रिपोर्ट’ मध्ये शहरातील पायी चालण्यास व सायकलसाठी योग्य रस्त्यांची परिस्थिती व उपयुक्ततेचे सखोल मूल्यांकन करण्यात आले आहे. हा अहवाल दोन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागात आधीच पुनर्रचित रस्त्यांचे मूल्यांकन व दुसऱ्या भागात विद्यमान रस्त्यांची स्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात सर्वांसाठी समावेशक व योग्य शहरी वातावरण तयार करण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करण्यात आल्या आहेत.
मूल्यांकनासाठी एकूण १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निवड करण्यात आली होती. यात अजनी चौक ते रहाटे कॉलनी, ऑरेंज सिटी स्ट्रीट, अमरावती रोड, सेंट्रल बाजार, शंकरनगर व रिंग रोडचा समावेश आहे. या सर्वेक्षणासाठी त्रिसूत्री पद्धती वापरण्यात आलेली आहे. यात डिझाईन सर्वे, निरीक्षण सर्वे व नागरिकांचे मत नोंदविण्यात आले आहेत. हा संपूर्ण सर्वेक्षण मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या काळात करण्यात आलेला आहे.
अजनी ते रहाटे कॉलनी चौक सर्वोत्कृष्ट
या सर्वेक्षणानंतर दिलेल्या मानांकनामध्ये अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौक सर्वाधिक गुण घेऊन अव्वल आला आहे. यात रस्त्यांवर पादचाऱ्यानी फूटपाथ वापरणे, सायकलस्वारांसाठी हा रस्ता सर्वाधिक सुरक्षित असल्याचे या निष्कर्षातून दिसून आले. वाहतुकीच्या दृष्टीने सेन्ट्रल बाजार रोड व रिंग रोड हा सर्वाधिक कमी गुण मिळविणारा ठरला आहे, रिंग रोडवर, वाहनांचा वेग, पदचाऱ्यांसाठी जागा तसेच फूटपाथचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले आहे.
सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते करू – वसुमना पंत
“या अभ्यासामुळे आपल्याला कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्टपणे कळते. आम्ही या शिफारशी शहरपातळीवर लागू करून, सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते तयार करू, असे मत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी व्यक्त केले.
दिशा दर्शविणारा अहवाल
ही फक्त आकडेवारी नाही, तर दिशा दर्शवणारा अहवाल आहे. उदाहरणार्थ, वर्धा रोडवरील ८० टक्के लोकांनी सुधारणा झाल्यानंतर रस्ता अधिक सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. हीच लोकाभिमुख रचना म्हणजे खरी यशोगाथा असल्याची प्रतिक्रिया आयटीडीपी इंडीयाचे प्रोग्राम मॅनेजर श्री. प्रांजल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
निष्कर्ष:
हा अहवाल दर्शवतो की, पुनर्रचित रस्त्यांवर सुरक्षा, सुगम्यता नक्कीच सुधारलेली आहे. कमी गुण मिळवलेले रस्ते, विशेषतः रिंग रोड, तातडीने सुधारण्याची आवश्यकता आहे. हा अभ्यास नागपूर महानगरपालिकेसह सर्वांसाठी, विशेषतः लहान मुले, वृद्ध, आणि दिव्यांग व्यक्तींसारख्या संवेदनशील वापरकर्त्यांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्याच्या बांधिलकीला दर्शावितो. मोटारशिवाय वाहतुकीवर (Non-Motorised Transport – NMT) भर देत, हा अभ्यास विद्यमान रस्ते पायाभूत सुविधांतील बळकटी आणि त्रुटी दाखवत पुराव्याआधारित नियोजनाला मदत करणारा ठरणार आहे.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष:
सर्वाधिक गुण मिळवलेला सुधारित रस्ता – वर्धा रोड (अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौक), एकूण 1.3 किमी लांबीचा हा भाग सर्व निकषांमध्ये – डिझाईन, निरीक्षण, आणि नागरिकांच्या अनुभवानुसार – सर्वोत्तम ठरला.
८० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी चालणे, सायकल चालवणे आणि सुरक्षा या बाबतीत सुधारणा झाल्याचे सांगितले. सावली, वेगळ्या एनएमटी झोन्सची रचना, बसण्यासाठी जागा, आणि सुरक्षित चौक यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला.
निरीक्षणात दिसून आले की 100 टक्के पादचाऱ्यांनी फुटपाथचाच वापर केला.
काही भागांमध्ये फुटपाथवर वाहनं उभी करणं आणि सायकल मार्गाची कमतरता ही समस्या होती.
सुधारणेची गरज असलेले रस्ते
सेंट्रल बाजार रोड (लोकमत चौक ते बजाजनगर चौक), रिंग रोड. या दोन्ही रस्त्यांना कमी गुण मिळाले, कारण फुटपाथमध्ये खंड, अतिक्रमण आणि सुरक्षिततेचा अभाव होता. सेंट्रल बाजार रोड: अनेक पादचारी रस्त्यावरून चालताना आढळले.
रिंग रोडवर 90 टक्के लोक वाहतूक चालू असतानाही रस्त्याच्या कडेला चालताना दिसले. सायकल मार्ग नसतानाही, रिंग रोडवर ताशी 160 सायकलस्वार दिसले. यातून सायकल मार्गाची तातडीची गरज दर्शवते.
मनपाची कार्यवाही सुरू
मनपाने यावर कार्यवाही सुरू केली असून व्हीएनआयटी गेट ते काचीपुरा चौक हा भाग सध्या पुनर्रचना प्रक्रियेत आहे. रस्त्यांची दुरुस्ती तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन
स्पीड गनने घेतलेल्या सर्वेक्षणात बहुतेक रस्त्यांवर वाहनांचे वेग ६० किमी प्रति तास पेक्षा जास्त नोंदवले गेले. ऑरेंज सिटी रोड आणि अमरावती रोड वर दुचाकींचा वेग ७५ किमी प्रति तास पर्यंत गेल्याचे निदर्शनात आले आहे. हे वेग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षित रस्ते डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहेत आणि अपघाताचा धोका वाढतो. शहरी भागात आदर्श वेगमर्यादा 30–40 किमी/ता असावी. यासंदर्भात मनपा ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या अहवालातून स्पष्ट होते की, नागपूर शहरातील काही रस्त्यांमध्ये सकारात्मक बदल होत आहेत, तर काही भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हा अहवाल नागपूरच्या “लोक-केंद्रित व चालण्या योग्य शहर” बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारसींच्या आधारे, नागपूर महानगरपालिका आता सुरक्षित, आरोग्यदायी आणि समतामूल्य रस्त्यांच्या निर्मितीसाठी आपल्या प्रयत्नात अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
“या निष्कर्षांनी हे स्पष्ट केले आहे की, अजूनही बरीच कामे बाकी आहेत. उदाहरणार्थ, रिंग रोडसारख्या काही रस्त्यांवर १०० टक्के लोकांना रस्त्यावरून चालावे लागत होते, कारण फुटपाथ वापरण्यायोग्य नव्हते. तसेच, काही पुनर्रचित रस्त्यांवरही अर्ध्याहून अधिक लोकांनी रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटल्याचे सांगितले. नागपूर शहर या अडचणी दूर करण्यासाठी उत्तम रस्ता डिझाइन, धोरण सुधारणा, नियोजन पद्धतींचे सशक्तीकरण व प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्या माध्यमातून कार्य करेल, असे आयटीडीपी इंडीयाचे वरिष्ठ सहयोगी सिद्धार्थ गोडबोले यांनी सांगितले.