Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण; तपास कुठपर्यंत? मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती

Advertisement

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणातील तपासाबाबत महत्त्वाची माहिती सभागृहात दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी तपासाची सध्याची स्थिती स्पष्ट केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या दोन यंत्रणांकडून सुरू आहे. अनेक सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली, तरी AAIB चा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सांगितले की, तपासादरम्यान वैमानिक सुमित कपूर यांच्याबाबत काही शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यांसह इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली. मात्र, तपासात कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार किंवा पुरावा आढळून आलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी ब्लॅक बॉक्सबाबतही माहिती दिली. दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील आवश्यक माहिती यशस्वीरित्या मिळवण्यात आली असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही.

Advertisement

“सामान्यतः अशा तपासांचे अंतिम अहवाल तयार होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागू शकतात. मात्र, केंद्र सरकारला ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. दादांच्या पुण्यतिथीपूर्वी अंतिम अहवाल उपलब्ध व्हावा, असा प्रयत्न सुरू आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अंतिम अहवाल आल्यानंतरच अपघाताला जबाबदार असलेल्या घटकांबाबत स्पष्ट निष्कर्ष काढता येतील. त्यानंतरच आवश्यक असल्यास सीआयडी किंवा सीबीआयकडून पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

“भावनिक भूमिका महत्त्वाची असली, तरी तपास आणि न्यायप्रक्रिया पुराव्यांच्या आधारेच चालते. अंतिम अहवाल येण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.