Published On : Sat, Oct 19th, 2019

मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत ‘कत्ल की रात : अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

मतपेटीत मत टाकतानाही बदलू शकतात निर्णय, सोशल मिडिया वापरकर्ते उमेदवारांकडून ‘टार्गेट’

नागपूर: प्रचारतोफा थंडावल्यानंतरही सोशल मिडियावर मात्र मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘कत्ल की रात’सारखेच चित्र राहणार असल्याचे चित्र आहे. फेसबुक, व्हॉट्‌स अप या प्रचलित सोशल मिडिया ग्रुपवर उमेदवारांकडून एखादी अफवा पसरवून किंवा मुद्दा खोडून काढत मतदारांचे मत अंतिम क्षणी बदलविण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावर आलेला कोणताही मुद्दा हा भावनिकदृष्ट्या साथीच्या आजारासारखा पसरत असल्याने राजकीय पक्ष किंवा उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात पोस्टबाबत रणनिती तयार करीत आहे.

सोमवारी मतदान असून उमेदवारांचा प्रचार आज संपुष्टात आला. पारंपरिक पद्धतीने मतदानापूर्वीची रात्रच उमेदवारांना प्रचारासाठी गुप्त बैठका, चुहा बैठका घेण्याची शेवटची संधी होती. मात्र, आता सोशल मिडियामुळे मतदार रांगेत लागला असतानाही त्याचे मत पलटण्याची संधी उमेदवारांना मिळाली असल्याचे सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. प्रचारतोफा थंडावल्यानंतरही सोशल मिडियावर ग्रुप चर्चा, यातून ऐन मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या अफवा पसरविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांत तरुणाईची संख्या मोठी आहे. किंबहुना सोशल मिडिया तरुणाईचे व्यसन झाले आहे. हावर्ड युनिव्हर्सिटीच्या नव्या अहवालानुसार सोशल मिडिया वापरकर्ता हा एखाद्या मादक पदार्थाच्या नशेत अडकलेल्या तरुणांसारखाच आहे.

सोशल मिडिया वापरकर्ता तरुण स्वतःबाबत जी पोस्ट टाकतो, त्यावेळी त्याच्या मेंदूचा तोच भाग उत्तेजित होतो, जो एखाद्याने मादक पदार्थ घेतल्यानंतर होतो. मेंदूमध्ये अधिक प्रमाणात ‘डोपाईन’ अर्थात आनंदलहरी तयार करणारी स्थिती तयार होते. यातूनच सोशल मिडिया वापरकर्ता आनंदाने सदसदविवेकबुद्धीवर परिणाम होतो. एवढेच नव्हे तरुणाची एखादी पोस्ट रिट्‌विट, शेअर केल्यास किंवा लाईक केल्यास त्यांच्या मेंदूवर कोकीनच्या उत्तेजनेप्रमाणे परिणाम होत असल्याचे या अहवालातून पुढे आले. या अहवालाचा आधार घेतल्यास सोशल मिडिया वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येत असून मतदानाच्या शेवटच्या क्षणीही या मतदाराचे मत बदलू शकते, असे अजित पारसे म्हणाले.

मतदानासाठी रांगेत उभा असलेला सोशल मिडिया वापरकर्त्याच्या ग्रुपवर त्यांच्या आवडत्या उमेदवाराबाबत अफवा आली, तर अशावेळी तो कुठलीही शहानिशा न करता आपला विचार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार किंवा राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘कत्ल की रात’ची संधी आहे. सोशल मिडियावरील नकारात्मकता तत्काळ परिणाम करीत असल्याने आठ दिवसांपासून मत देण्यासाठी निश्चित केलेला उमेदवाराबाबतही तरुणाचे मत बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशासाठी क्षमतावान नेत्याऐवजी अयोग्य नेते निवडले जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

‘के-स्केल’चा वापर
सध्या अनेक सिग्नलवर वाहन थांबताच 30 सेकंदांसाठी का होईना तरुण मोबाईल काढून सोशल मिडियावर काय नवे आले, याची माहिती घेताना दिसून येते. यातूनच सोशल मिडियाची व्यसनाधीनता दिसून येत आहे. कोरियामध्ये अशा तरुणाईने मर्यादा ओलांडली. त्यामुळे तेथे इंटरनेट व्यसनाधिनतेचा स्तर मोजण्यासाठी ‘कोरिया स्केल’ नावाचे तंत्र शोधण्यात आले. आता जगभरात हे तंत्र वापरण्यात येत आहे. तरुणाईची इंटरनेट व्यसनाधितेची माहिती घेण्यासाठी राजकीय पक्षांकडूनही आता तंत्राचा वापर करण्यात येत आहे.


सध्याचा तरुण किंवा सोशल मिडिया वापरकर्ता हा सोशल मिडियावरील माहितीवर निर्भर झाला आहे. हेच हेरून उमेदवाराची प्रतिमा मलिन करणे किंवा उजळ करण्याचे प्रकार केले जात आहे. याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मिडियामुळे मतपेटीत मत पडेपर्यंत मतदारांची मानसिकता बदलणार नाही, याचीही आता शाश्वती राहीली नाही.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.