गरजू लोकांवर जाळे फेकणारे सक्रिय : व्यापाऱ्यांनाही ऑनलाईन व्यवसायाचे आमिष.
नागपूर : कोरोनाने सामान्य नागरिक, व्यावसायिक, लहान व्यापारी खचले असून त्यांच्या या मानसिकतेचा लाभ उठविण्यासाठी सोशल मीडियावर विविध आमिषाच्या माध्यमातून जाळे फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. आधीच लॉकडाउनमुळे त्रस्त व्यापाऱ्यांना ऑनलाईन खरेदी-विक्रीचे तर सामान्य नागरिकांना रेमडीसीवीर, औषध, मेडिकल इन्शुरन्ससाठी अडव्हान्सकरिता फेक लिंक पाठवून फसवणूक करणारे सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत कोरोनाने ग्रस्त किंवा लॉकडाऊनने त्रस्त झालेले व्यापारी सोशल मीडियावर स्वतःच्या स्थितीबाबत भावनिक पोस्ट करीत आहेत. कोरोनाने ग्रस्त कुटुंब कधी ऑक्सिजन तर कधी बेड तर कधी इंजेक्शनसाठी सोशल मीडियावरून साद घालताना दिसते. अशा पोस्टवर अनोळखी व्यक्तीही भावनिक पोस्ट टाकून मैत्री निर्माण करतात, यातूनच ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार होण्याची भीती सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे. पोस्ट करणाऱ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, उत्पन्नाची साधने याचा अभ्यास करून त्यांना टार्गेट केले जात आहे.
मनस्थिती बरी नसल्याने समदुखी समजून ज्यांच्याशी मैत्री वाढविली जाते, ते अनेकदा जाळे फेकणारे असू शकतात. व्यापाऱ्यांच्या पोस्टवरून त्यांच्या मनःस्थितीचा अभ्यास करून त्यांना अनधिकृत व्हाट्सएप ग्रुपमध्ये जोडल्या जात आहे. त्यांचे उत्पादन कुठल्याही जाहिरातीशिवाय विकू शकतात, अशी थाप मारली जात असून एक दोन खरेदीचे व्यवहार करून मोठया ऑर्डरसाठी अडव्हान्स घेऊन नंतर हे ग्रुप अडमीन गायब होत असल्याच्या घटना घडत असल्याचे निरीक्षण पारसे यांनी नोंदविले. एवढेच नव्हे तर कोविन अन आरोग्य सेतुसारखे शासनाच्या ऍपप्रमाणे ऍप तयार केले जात असून त्यावर नोंदणीची लिंक पाठवून सामान्य नागरिकांचे बँक खातेही नियंत्रित केले जात असल्याचेही पारसे म्हणाले.
सोशल मीडियावर पोस्ट टाकताना, व्यक्त होताना खूप सावध राहण्याची गरज आहे. या माध्यमातून मदत मागताना खाजगी माहिती अर्थात मोबाइल क्रमांक, बँक खाते कौटुंबिक स्थिती सार्वजनिक होणार नाही अन सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची संधी मिळणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अनधिकृत माहिती, मदत केंद्राची शहानिशा करावी. प्रायव्हेट बिजनेस ग्रुपबाबत खात्री करून ज्वाईन करावा.
– अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

