Published On : Fri, Feb 12th, 2021

“चॅलेंज #” नेटकऱ्यांपुढे उभे करणार नवे आव्हान : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ व विश्लेषक.

Advertisement

बेसावधपणा महागात पडण्याची शक्यता गुन्हेगारांकडून वापर होण्याची भीती.

नागपूर: कधी काळी चोरटे किंवा गुन्हेगार घराची रेकी केल्यानंतर तेथे चोरी करीत होते. आता मात्र सोशल मिडिया वापरकर्ते बाप-लेक, माय-लेक, कपल, नऊवारी आदी ‘चॅलेंज’च्या नावावर स्वतःची आर्थिक क्षमता, घरातील परिस्थितीची माहिती जाहीर करीत आहेत. विविध ‘चॅलेंजच्या ट्रेंड’मध्ये सहभागी होणाऱे नेटकरी स्वतःपुढेच नवे संकट, आव्हान तर उभे करीत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. सोशल मिडियावरील फेसबुक, इन्स्टाग्रामवर आवडते फोटो पोस्ट करणे हल्ली प्रत्येकाचीच सवय झाली आहे. त्यातच कुठले ना कुठले चॅलेंज फोटो पोस्ट करणाऱ्यांना खुणावत असते. अजाणतेपणामुळे नेटकरी संकटालाच आमंत्रण देत असल्याचे निरीक्षण सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविले आहे.

सद्यस्थितीत फेसबुकवर बाप-लेक, माय-लेक, कपल, एलिजिबल वर, एलिजिबल वधू, नऊवारी, कोल्हापुरी साज अशा अनेक चॅलेंजची बजबजपुरी दिसून येत आहे. याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. या चॅलेंजमधून नेटकरी घरातील सदस्य संख्या, घराची माहिती, राहणीमान, घरातील वृद्ध मंडळी आदीची माहिती देऊन स्वतःची आर्थिक क्षमताच जाहीर करीत असल्याचे चित्र आहे. अनेकांच्या फोटोमध्ये सोन्याची अंगठी, गळ्यातील मंगळसुत्र, सोन्याची चेन आदी दिसून येत आहे.

एकप्रकारे जणू चोरट्यांना आमंत्रित केले जात असल्याचे पारसे यांनी म्हणाले. अनेकजण जंगलात किंवा महामार्गावर लॉंग ड्राईव्हचे लाईव्ह फेसबूक करतात. यातूनच अनेकजण घरी नसून लवकरच परत येण्याची शक्यता नसल्याची माहितीही चोरट्यांना पुरवित असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. यातून अपहरण, दरोड्यासारखा गंभीर गुन्हा घडण्यासाठी आवश्यक माहिती काही लाईक्ससाठी नेटकरी बिनधास्त जाहीर करीत गुन्हेगारांना आयतीच संधी देत असल्याचे चित्र आहे.

आपली आर्थिक स्थिती, कौटुंबिक माहिती जाहीर करणे म्हणजे अपहरण, खंडणीसारख्या घटनांना आमंत्रित करण्यासारखेच आहे. बाहेर गेल्यानंतर त्याबाबत लाईव्ह करणे म्हणजे चोरट्यांना घर खुले आहे, अशी माहितीच देणे होय. सोशल मिडियाचा वापर करताना अघटित घडणार नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ व विश्लेषक.

www.ajeetparse.com