
नागपूर: नागपूर शहरातील रेल्वे पायाभूत सुविधांना नवे रूप देण्याच्या दृष्टीने अजनी आणि नागपूर रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास कामांना गती मिळाली आहे. अजनी रेल्वे स्टेशनवर सध्या प्लॅटफॉर्म उभारणीसह विविध बांधकामे सुरू असून, मे 2026 पासून येथून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे डीआरएम विवेक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचं काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर बदल केले जाणार आहेत.
नागपूर आणि अजनी या दोन्ही रेल्वे स्थानकांना आधुनिक आणि जागतिक दर्जाचं स्वरूप देण्यात येत असून, यासाठी सुमारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. नागपूर स्टेशनच्या पश्चिम बाजूस नव्या इमारती उभारण्यात येत असून, प्लॅटफॉर्मचे बळकटीकरणाचे कामही एकाचवेळी सुरू आहे. नव्या आराखड्यानुसार प्रवाशांसाठी 23 लिफ्ट आणि 31 एस्केलेटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अजनी रेल्वे स्टेशनवर चार नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जात असून, त्यासोबत लिफ्ट व एस्केलेटरसारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात नागपूर शहरातील रेल्वे वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, नागपूर–वर्धा–यवतमाळ रेल्वे मार्गाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. सध्या वर्धा ते कळंब दरम्यान 39 किलोमीटर अंतरावर रेल्वे धावू लागल्या असून, उर्वरित कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण पूर्ण झालं आहे. हा संपूर्ण प्रकल्प सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक होणार असल्याचं चित्र आहे.








