नागपूर : गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत वायुसेना नगर येथे कर्तव्यावर असलेल्या हवाई दलाच्या सार्जंटने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. जैविरसिंग असे मृतकाचे नाव आहे.
जैविरसिंग काल रात्री त्याच्या अल्फा 8 गार्डमध्ये ड्युटीवर होते. रात्री दीडच्या सुमारास त्याने जवळच असलेल्या रायफलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत गोळी त्यांच्या कवटीतून गेली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज ऐकून मेंटेनन्स कमांड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी गार्ड रूमकडे धाव घेतली जिथे त्यांना जैविरसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
या घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी दाखल होत जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला.मात्र, या जवानाने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. गिट्टीखदान पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.