Published On : Thu, Aug 29th, 2019

समाजकार्य महाविद्यालयात एड्स नियंत्रण जनजागृती कार्यशाळा संपन्न

Advertisement

कामठी :- येथील सामाजकार्य महाविद्यालयात एड्स नियंत्रण वा प्रतिबंध कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालय,कामठी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रद्धा भजिपाले होत्या,तर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.नविता चव्हाण,जिल्हा समन्वय अधिकारी तुनजा शेवारे , डॉ. प्रणाली पाटील, डॉ. रुबीना अन्सारी रासेयो अधिकारी प्रा.महम्मद असरार, डॉ. अन्सारी, डॉ. लोहिया, डॉ. चिवंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात झाली. डॉ. नविता चव्हाण यांनी पी. पी. टी. प्रेझेन्टेशनद्वारे विद्यार्थ्यांना एड्स या महाभयंकर रोगची करणे, लक्षणे,अरोग्यावर होणारे दुष्परिणाम, व रोगापासून बचावाच्या उपाययोजना इत्यादीविषयी सविस्तर माहिती दिली. तरुण विद्यार्थी विद्यार्थीनींनी या रोगापासून दूर राहण्यासाठी लैंगिक शिक्षणाचे ज्ञानही त्यांनी दिले. यानंतर डॉ.प्रणाली पाटील डॉ. लोहिया डॉ. अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयावर मार्गदर्शन करून जनजागृती केली. कार्यशाळेच्या अध्यक्षा वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रद्धा भजिपाले यांनी एड्स विषयावर मार्गदर्शन केले व राष्ट्रीय सेवा योजनच्या विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती कार्यक्रम व विविध उपक्रम राबवून देशाला एड्समुक्त करावे, असे आवाहन केले.

कार्यशाळेत कामठी येथील शेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, किशोरीताई भोयर फार्मसी कॉलेज, सामाजकार्य महाविद्यालय या तीन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रत्येक महाविद्यालयातील एन. एस. एस.च्या 15 विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गट तयार करून रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. या रेड रिबन क्लबच्या सदस्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून एड्स जनजागृती प्रशिक्षण देण्यात आले.

संचालन प्रतिभा कडू व सविता मेसरकर यांनी केले .डॉ. सविता चिवंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, कविता शंभरकर, प्रशांत मेश्राम यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.