Published On : Wed, Dec 18th, 2019

शेतकर्‍यांनी हानीभरपाई साहाय्य देण्यासाठी विधानसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि गदारोळ

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गदारोळाने चालू झाला. शेतकर्‍यांना हेक्टरी २५ सहस्र रुपये साहाय्य देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेऊन विधानसभेत गदारोळ घातला. या गदारोळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडून त्यांच्यात धक्काबुक्की झाल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी आणि सत्ताधारी गटांतील सदस्यांना समज दिली. त्यानंतरही विरोधकांनी गदारोळ चालूच ठेवल्यामुळे प्रथम ३० मिनिटे, १० मिनिटे आणि नंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

१. विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाल्यानंतर विधानसभा नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे पिकांची हानी झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ सहस्र रुपये देण्याची घोषणा केली होती. १६ डिसेंबरला सभागृहात पुरवण्या मागण्यांवर चर्चा न करता त्या संमत करण्यात आल्या. यावरून महाविकास आघाडीने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांचा विश्‍वासघात मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना साहाय्य करण्याचा दिलेला शब्द पाळावा. प्रसंगी सभागृहातील कामकाज चालवू नका.
२. मात्र या विषयावर चर्चा करण्याची अनुमती अध्यक्ष नाना पटोले यांनी नाकारली.

३. त्यामुळे विरोधी गटातील आमदारांनी या विषयावर चर्चा करण्याची मागणी करून घोषणाबाजी चालू केली. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी गोंधळ घातला. या वेळी अध्यक्ष पटोले यांनी ‘सभागृहात विरोधी सदस्यांनी फलक फडकावू नये. जे फलक फडकावत आहेत, त्यांची नावे नोंद करा’, असा आदेश दिला; मात्र विरोधी सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून घोषणा चालूच ठेवल्या.

४. काही विरोधक सभागृहात फलक फडकावत असतांना त्याला सत्ताधारी गटातील सदस्यांनी फलक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. या वेळी विरोधकांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोेषणा दिल्या.

५. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी भाजपच्या सदस्यांना, तर गृहमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी शिवसेनेच्या आमदारांना बाजुला करून शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
६. २ वेळा कामकाज स्थगित होऊन पुन्हा चालू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षातील सदस्य संयमाने वागेल, कोणीही अंगावर जाणार नाही. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पाळल्या जातील; मात्र सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी फलक ओढणे चुकीचे आहे. दोन्ही गटांकडून भूमिका समजून घेतली पाहिजे, असे सांगून त्यांनी पुन्हा शेतकर्‍यांना हेक्टरी २५ सहस्र रुपये देण्याची मागणी केली.

७. या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, सत्तेत असतांना विरोधकांचे हात कोणी धरले होते. आतापर्यंत आम्ही शेतकर्‍यांना ६ सहस्र ७०० कोटी रुपयांपैकी २ सहस्र १०० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. केंद्र सरकारकडून अजूनही १४ सहस्र ६०० कोटी रुपये आलेले नाहीत. तरीही आम्ही राज्याच्या वतीने शेतकर्‍यांना साहाय्य करत आहे. आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही.

आजपर्यंतच्या इतिहास सभागृहात जे घडले ते अत्यंत चुकीचे ! – विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले

आजपर्यंतच्या इतिहासात सभागृहात जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. सदस्यांना ही न शोभणारी घटना आहे. मुख्यमंत्र्यांसमोर फलक फडकावणे चुकीचे आहे. दुसर्‍यांदा असे प्रकार करू नयेत, यासाठी मी सत्ताधारी आणि विरोधक यांना समज देतो. सदस्यांनी कामकाजाविषयी सहकार्य करावे. विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे; मात्र एकमेकांच्या अंगावर कुणीही जाऊ नये, याची नोंद घ्यावी.

विधानसभा अध्यक्षांकडून सर्वपक्षीय गटनेत्यांना बोलावून चर्चा !
सभागृहात गदारोळा चालू असतांना दोन्ही गटांतील काही आमदार एकमेकांना धक्काबुक्की केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वपक्षीय गट नेत्यांना त्यांच्या दालनात बोलावून घेतले. या वेळी पटोले यांनी सभागृहाचे कामकाज नियमाने चालावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली.