Published On : Mon, Jul 9th, 2018

दोन महिन्यानंतर पथदिव्याचा मार्ग मोकळा

कन्हान : – येथून जवळच असलेल्या बनपुरी येथील बंद असलेल्या पथ दिव्यांना सुरू होण्यासाठी तब्बल दोन महिन्याची वाट पहावी लागली. विशेष म्हणजे ग्रामवासियांनी महादेव पाटील व राजेश मलिये यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर लागलीच सर्व समस्या सोडविण्यात आली .

साटक जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या बनपुरी येथील पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. बनपुरी येथील नागरिकांना प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी चार किलोमीटर अंतरावरील नगरधन या गावी जावे लागते. येतांना उशीर होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात साप, विंचू यासारख्या जिवजंतूचा धोका बळावला होता.

मात्र विज वितरण कंपनीचे अधिकारी वेगवेगळे कारण देत पथदिवे सुरू करण्यास चालढकल करीत होते. अखेर शनिवारी (ता. सात) बनपुरी येथील नागरिकांनी माजी सरपंच महादेव पाटील व कामगार नेते राजेश मलिये यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. जोपर्यंत पथदिवे सुरू होणार नाही तसेच गावातील विजेची समस्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अखेर या आंदोलनाची दखल घेत अभियंता श्री तेजे व श्री कावळे यांनी तत्काळ समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली. आंदोलनकर्त्यां सोबत विद्युत कर्मचार्‍यांना गावात पाठविण्याचे मान्य केले. उर्वरित समस्या रविवारी (ता.आठ) दुरुस्ती करण्याचे मान्य केले. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे रविवारी सुरू झाले.

या आंदोलनात राजेश मलीये, महादेव पाटिल, अरविंद सावरकर , पंजाबराव देशमुख, अनिल भोंडे, गणराज देशमुख, गजानन बावनकर, शेषपाल आंबागड़े, सुनील बावनकुले , होमराज घावडे, उमेश हटवार, शिवदास आखरे, पिंटू बावनकुळे, विष्णु बावनकुळे , फागों ईखार व ग्रामवासियांचा सहभाग होता.