प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड होणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी कळविले आहे.
एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते नववी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरले आहे त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे गुण भरण्याचे शासनाकडून निर्देश असून हाच निकष सातवी ते नववीच्या रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागू करण्यात आला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 गुणांपैकी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणाच्या आधारे निवड यादी जाहीर करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणाऐवजी श्रेणी भरलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाही. अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला मोबाईल क्रमांक जन्मतारीख, विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरणे व गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गुण mtpss.org.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे गुण 900 पैकी मिळालेले गुण नोंदवयाचे आहे. वर्ग पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रगती प्रस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेकडून गुण प्राप्त करुन मुख्याध्यापकांनी संकेतस्थळावर 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केले आहे.