Published On : Fri, Sep 3rd, 2021

आरटीओ मध्ये आधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल

भंडारा:- आधुनिक इंटरसेप्टर वाहन अंमलबजावणी पथकासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा येथे प्राप्त झाले आहे. या वाहनामध्ये आधुनिक स्पीड गन, ब्रेथ अनालायझर, उद्घोषक यंत्रणा तसेच ऑनलाईन चालान सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्याची व नियमांची तसेच रस्ता सुरक्षा विषयक बाबींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या वाहनांमुळे व वाहनांच्या वाढत्या वेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्यासाठी परिवहन विभागाची अंमलबजावणी यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून 76 नवीन महिंद्रा अँड महिंद्रा बनावटीच्या स्कॉर्पिओ इंटरसेप्टर वाहनाचे वितरण मोटर वाहन विभागास करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते वांद्रे पूर्व, मुंबई येथे 31 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात सदर वाहनांचे लोकार्पण करण्यात आले व ही वाहने परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत क्षेत्रीय कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यापैकी एक आधुनिक इंटरसेप्टर वाहन अंमलबजावणी पथकासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा येथे प्राप्त झाले आहे.

या वाहनामध्ये आधुनिक स्पीड गन, ब्रेथ अनालायझर, उद्घोषक यंत्रणा तसेच ऑनलाईन चालान सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्याची व नियमांची तसेच रस्ता सुरक्षा विषयक बाबींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा राजेंद्र वर्मा यांनी सांगितले आहे.