Published On : Fri, Sep 3rd, 2021

तंत्रज्ञानातून मनपाच्या प्रशासकीय कामात गती आणि पारदर्शकता आणावी : महापौर दयाशंकर तिवारी

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेबाबत बैठकीत दिल्या सूचना

नागपूर : बदलत्या काळानुसार नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्याच्या अनुषंगाने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि समस्या त्वरित कशा सोडविता येतील या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्या. गुरुवारी (ता. २) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबजाव देशमुख स्मृती सभागृहात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धेची अंमलबजावणी करण्यासाठी आभासी बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

गुरुवारी (ता. २) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार गिरीश व्यास, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राऊत, अशोक पाटील, विजय हुमणे, घनशाम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख आभासी माध्यमांतून उपस्थित होते.

राजीव गांधी तरुण वयात देशाचे पंतप्रधान बनले. त्यानंतर देशात काम करण्याचा दृष्टिकोन बदलला. राजीव गांधी यांच्यामुळे देशात संगणक क्रांती झाली आणि प्रशासकीय व्यवस्थापनात कॉम्पुटरचा प्रवेश झाला. संपूर्ण देशात प्रशासकीय कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याचे काम राजीव गांधी यांनी केले, असे प्रतिपादन यावेळी महापौरांनी केले. पुढे ते म्हणाले, महानगरपालिका अशी एक संस्था आहे ज्या संस्थेचा थेट संबंध नागरिकांशी आहे. त्यामुळे मनपाच्या कामात गतिमानता असणे आवश्यक आहे.

सध्या नागपूर मनपाद्वारे वेबसाईट, हॅलो महापौर, नागपूर लाईव्ह सिटी अँपच्या माध्यमातून तक्रार निवारण करण्याचे काम सुरु आहे. मात्र यात आणखी तंत्रज्ञानाचा वापर करून गती आणण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना यावेळी महापौरांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना केली. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कश्या सुटतील याकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागेल. यासाठी ‘टार्गेट टास्क’ बेसवर काम केल्यास हे सहज शक्य होईल, मनपा हद्दीत असलेल्या सर्व मालमत्तांचे ऑनलाईन म्युटेशन करता येईल काय? तसेच मनपा कर्मचाऱ्यांचे सर्विस बुक ऑनलाईन करता येऊ शकेल काय? यावर विचार करण्याच्या सूचनाही आयुक्तांना केल्या.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्व कार्यालयांनी भाग घेऊन उत्तम कार्य करावे. यामुळे आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. आधी झालेल्या चुका होणार नाहीत. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कशा सुटतील यांकडे लक्ष देऊन कार्य करा, असेही महापौर यावेळी म्हणाले.

अभियानामुळे कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत : आयुक्त
महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुडलेली संस्था आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी काम करा अशा सूचना आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले, राजीव गांधी गतिमानता अभियान व स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते. या माध्यमातून प्रशासकीय कामात गती येते. यातून आपल्याला आपल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करण्याची संधी प्राप्त होते. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्व झोनच्या अधिकाऱ्यांनी या अभियाना अंतर्गत सातही क्षेत्रात भाग घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. आज आपण कुठे आहोत, कोणत्या गोष्टीत मागे आहोत यावर एक ब्लूप्रिंट तयार करा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येईल याकडे लक्ष द्या अशा सूचनाही यावेळी आयुक्तांनी केल्या. सोबतच या अभियानाअंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना मनपातर्फे बक्षीस देता येऊ शकेल, असेही ते म्हणाले. यावेळी आयुक्तांनी सर्वांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान सन २००२ पासून राबविण्यात येत आहे. प्रशासकीय गतिमानता अभियानाची कालावधी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोंबर पर्यंत राहील. कामात गतिमानता आणि पारदर्शकता यावी हा यामागील उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कार्यालयांना रोख बक्षीस दिले जाते. यात विविध कार्यालये सहभागी होत असतात. अभियानात ७ कार्यक्षेत्र निश्चित केलेली आहेत. यामध्ये कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब, सेवांची गुणवत्ता/दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटा/तक्रार मुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना/प्रयोग/उपक्रम या कार्यक्षेत्राचा समावेश आहे. त्यांनंतर नियुक्त केलेल्या समितीमार्फत मूल्यमापन करून कामाचा आढावा घेण्यात येतो आणि उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कार्यालयांना बक्षीस दिले जाते, अशी माहिती मनपा उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली.