Published On : Sat, Sep 28th, 2019

कोराडी नवरात्रोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे – श्रीकांत फडके

नागपूर, : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे रविवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत असून, प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेत संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे. तसेच परिसराची स्वच्छता आणि साफसफाईसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी यंत्रणांना दिल्या.

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अध्यक्ष ॲड. मुकेश शर्मा, कोषाध्यक्ष बाबुराव भोयर, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त दयाराम तडसकर, नंदुबाबु बजाज यांच्यासह पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलिस उपायुक्त नीलोत्पल, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार सुनील तरुडकर तसेच विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या रविवारपासून कोराडी देवस्थान येथे नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. या उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे शहराच्या विविध भागातून 241 शहर बसेस सुरु राहणार असून, त्याच्या तीन हजारावर बस फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी कोराडी संस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. तसेच भाविकां सुरक्षेसाठी मंदिर परिसरात तसेच महादुला टी पॉईंटपासून सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नवरात्रोत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करुन आणि परवानगी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. वाहन व्यवस्था पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. याच परिसरात भाविकांसाठी मदत केंद्र, पोलीस चौकी सुरु ठेवण्याच्या सूचनाही अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी केल्यात.

संपूर्ण परिसरात महाजेनकोतर्फे पथदिव्यांची व्यवस्था करावी, तसेच परिसरात चोवीस तास आरोग्य पथक तैनात ठेवावे. अॅंब्यूलन्सची सुविधा, भाविकांसाठी चौवीस तास पिण्याचे पाणी, परिसराच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती, शौचालय आदी सुविधा कोराडी ग्रामपंचायत, श्री. महालक्ष्मी जगदंबा देवस्थान,

महानगरपालिका, आरोग्य विभाग, महाजेनको, महसूल विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.