Published On : Thu, Aug 8th, 2019

जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय गौरव सोहळयाचे आयोजन

Advertisement

नागपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने 9 ऑगस्ट 2019 रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला व सूचना दिल्या.
यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने दिनांक 23 डिसेंबर 1994 रोजी ठराव घेवून दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याबाबत घोषणा केली. आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस व पारंपारिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन राज्यस्तरीय गौरव सोहळा दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी, सकाळी 11 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील संस्थांना प्रोत्साहन व त्यांच्या गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 29 आदिवासी सेवक पुरस्कार व 9 आदिवासी सेवा संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मिशन शौर्य-2 अंतर्गत माऊंट एवरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह गौरव करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा, तसेच इतर शाळेतील मार्च-2019 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या 154 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 56 अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘महाराष्ट्र आदिवासी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हस्तकला व चित्रकला या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 17 अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘आदिवासी कलाकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. आश्रमशाळा कायापालट अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या एकूण 19 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सामुहिक, वैयक्तीक वनहक्क यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती तसेच पेसा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती यांना गौरविण्यात येणार आहे. अटल आरोग्य वाहिनी मधील वैद्यकीय अधिकारी, आदिवासी बोली भाषेमध्ये पुस्तके भाषांतर करणारे शिक्षक यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.