Published On : Mon, Feb 3rd, 2020

अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा खुनाचा छडा लावण्यास क्राईम ब्रांचच्या पथकाला यश

नागपूर: दोन महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात क्राईम ब्रांचच्या पोलिस पथकाला यश आले आहे. मोनेश भागवत ठाकरे (२५ वर्षे, रा. शिवनगर, नागपूर) असे घटनेतील मृतकाचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेचे अपर आयुक्त निलेश भरणे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषेत या खुनाची माहिती दिली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय गजानन येवले (२५ वर्षे, रा. भवानी नगर) यासह इतर आरोपी अमोल उर्फ विक्की श्रीचंद हीरापूरे (२५ वर्षे) आणि निलेश दयानंद आगरे (१९ वर्षे) यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

२७ नोव्हेंबर रोजी फिर्यादी राजेश तिवारी यांनी पारडी पोलिसांकडे मोनेश बेपत्ता असल्याची तक्रार पारडी पोलिसांकडे नोंदविली होती. याआधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी खबèयांना सक्रीय केले. त्यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे अक्षयने मोनेशचा खून केल्याची माहिती मिळाली.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मोनेश आणि अक्षय यांनी एका बीअरबारमध्ये मनसोक्त दारू ढोसली. यानंतर मुख्य आरोपीने मोनेशला २२ एकरी शेतावर नेऊन अन्य २ आरोपींच्या मदतीने त्याचा खून केला. घटनेचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मोनेशचे शव पूर्णपणे जळाले नसल्याने त्याचे अवशेष एका साडीत गुंडाळले आणि चारचाकी वाहनाने जामठा भागातील एका निर्मनुष्य जागेवर नेऊन फेकले.

येथे पशूंनी ते अवशेष खाल्ल्यामुळे त्यातील केवळ दोनच हाडे पोलिसांना मिळू शकली. घटनेच्या तपासात गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त निलेश भरणे, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांसह अन्य पोलिस अधिकारी अमोल काचोरे, ओमप्रकाश भलावी, श्रीनिवास मिश्रा, सुनील चौधरी, रवींद्र राऊत, पंकज लांडे, विजय यादव, सचिव आंधळे, उत्कर्ष राऊत, वाहनचालक नावेद, फिरोज, अमोल आणि प्रवीण यांनी सहभाग घेतला.

आरोपी म्हणतो, आपली फिल्डिंग लावल्यानेच केली हत्या
— बेपत्ता झालेल्या मोनेशचा पोलिसांनी खबऱ्यांच्या च्या मदतीने शोध घेणे सुरू केले. तेव्हा आरोपीने दारूच्या नशेत एका खबऱ्यांशी बोलताना, विनोदने आपल्याला मारण्यासाठी फिल्डिंग लावल्याने आपणच त्याचा मित्र मोनेशची हत्या केल्याचे सांगितले. ही बाब पोलिसांना माहिती झाल्याने त्यांनी अक्षयला ताब्यात घेऊन त्याची विचारणा केली. पोलिसी हिसका दाखविताच त्याने पूर्ण कहानीच सांगितली. त्यानुसार अक्षय हा ९४ दिवसांची तुरुंगात शिक्षा भोगत होता.

या दरम्यान घटनेतील आरोपी अमोल हा त्याला तेथे भेटायला आला. अक्षयचा प्रतिस्पर्धी विनोद वाघने आपल्याला मारहाण केली. ते तुलाही जीवे मारणार आहे, असे त्याने अक्षयला सांगितले. तेव्हा तुुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण विनोदला पाहून घेऊ, असे म्हणत त्याने अमोलला समजाविले.

घटनेच्या दिवशी विनोदचा मित्र मोनेश हा अक्षयला भेटला असता त्याने मोनेशला बीअरबारमध्ये नेऊन दारू पाजली. मोनेश हा आपल्यासोबतच दारू पिल्यानंतर आपल्याला एखाद्या जागी नेऊन जीवे मारणार, याचा अंदाज अक्षयला आला होता. यामुळे त्यानेच मोनेशचा खून करण्याचा कट आखला. अखेर त्याला २२ एकरी शेतावर नेले आणि येथे साथीदारांच्या मदतीने मोनेशची हत्या केली.