Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 27th, 2021

  सुरक्षेच्या सर्व मानकांचे पालन करत, महा मेट्रोची प्रवासी सेवा अखंड सुरु

  – कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष उपाय योजना

  नागपूर : सुरक्षेच्या मानकांचे पालन करत आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेत महा मेट्रोची प्रवासी सेवा १६ ऑक्टोबरपासून आजतागायत अखंडपणे सुरू आहे. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर, प्रवासी आणि मेट्रो कर्मचारी तसेच अधिकार्यांचा प्रवास सुरक्षित असावा या करीता अनेक महत्वाच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. सरकारने कोव्हीडच्या बचावासंबंधी जाहीर केलेल्या सूचना आणि नियमांसोबतच प्रवाश्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेट्रो स्थानक आणि मेट्रो ट्रेनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. ह्याच पार्श्वभूमीवर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक संपूर्ण व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवत आहेत.

  सरकारने घोषित केलेल्या अनलॉक नियमावली प्रमाणे, मेट्रो प्रवासी सेवा टप्प्या-टप्प्याने सुरु करायची होती. म्हणूनच सुरवातीला एक्वा मार्गिकेच्या अंतर्गत असलेल्या रिच-३ दरम्यान प्रवासी सेवा सुरु करण्यात आली आणि नंतर रिच-१ च्या ऑरेंज लाईनवर सेवा सुरु करण्यात आली. सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु आहेत. तसेच ऑरेंज मार्गिकेवर रिच – १ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी सेवा सुरु आहेत. वाढत्या प्रवाश्यांच्या संख्येच्या अनुषंगाने मेट्रो स्थानकाच्या प्रत्येक भागाची तसेच मेट्रो ट्रेन मधील एकेका पार्टची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता केली जात आहे.

  प्रवासादरम्यान प्रवाश्यांकरता मास्क घालणे बंधनकारक
  या अंतर्गत घेतलेल्या विशेष उपाय योजनान्तर्गत प्रवाश्यांकरता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क घातल्याशिवाय कुठल्याही प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश दिला जात नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान तपासले जाते, यात काहीही तफावत आढळल्यास स्टेशन नियंत्रक या संबंधीची माहिती आरोग्य विभागाला देऊन रुग्णाला तिकडे पाठवले जाते.

  सॅनिटायझेशन :- प्रत्येक प्रवाश्याला स्थानकाच्या प्रवेशालाच सॅनिटायझर दिले जात असून, स्थानकाच्या प्रवेशापासूनच सोशल दिसतानसिंगचे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. मेट्रो गाडीत असलेले सर्व प्रवासी उतरल्या नंतरच नव्याने प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांना डब्यात प्रवेश दिला जातो. याशिवाय मेट्रोतील सीटवर मार्किंग केलेल्या जागेनुसारच बसण्याबाबत सूचना दिल्या जातात. प्रवाश्यांनी लिफ्ट किंवा इतर उपकरणांच्या बटनांना, तसेच एस्केलेटरच्या बारला स्पर्श करू नये या सूचना देखील वेळोवेळी स्थानकावरील ऑडिओमधून दिल्या जातात.

  प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग : मेट्रोने प्रवास करण्यास प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान स्टेशनच्या प्रवेश द्वारावर तपासले जाते. ज्या प्रवाश्यांचे तापमान ३८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल किंवा ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल अश्या प्रवाश्यांना प्रवास करण्यास मनाई मनाई आहे. अश्या प्रवाश्यांना आरोग्य विभागाकडे जाण्याचे योग्य दिशानिर्देश देऊन तिकडे पाठवले जाते. सोशल डिस्टंसीग संबंधी मानकांचे पालन करण्याकरिता स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्मसह मेट्रो गाडीत त्या संबंधी दिशा-निर्देश दिले आहेत.

  डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन : प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा या करीता हे पाऊल उचलले गेले आहे. महा मेट्रो ऍपचा तसेच महा कार्डचा त्यांनी वापर करावा यासाठी जनजागृतीचे अनेक उपाय योजना केले जात आहे . महा मेट्रो तर्फे डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावे याकरिता प्रोत्साहन दिले जात असले तरीही नगद पैसे देत तिकीट देखील घेता असल्याने, जमा झालेलया रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जाते.

  कोव्हीड संबंधी मानकांच्या पालनाबाबत जनजागृतीसाठी विशेष कर्मचारी
  कोव्हीड संबंधी मानकांचे पालन करण्याचे दिशा निर्देश प्रवाश्यांना समजावून सांगण्यासाठी व प्रशिक्षित करण्यासाठी सर्व स्थानकांवर विशेष कर्मचारी नेमले गेले आहेत. स्टेशनवरील तसेच मेट्रो गाडीत तैनात असलेले हे कर्मचारी प्रवाश्यांना या संबंधी मार्गदर्शन करतात. स्टेशनच्या आत येताना तसेच बाहेर जाताना या मानकांचे पालन होण्यासंबंधी ते लक्ष देऊन असतात. स्टेशन तसेच मेट्रो गाडीत या सर्व मानकांबद्दल सातत्याने सूचना देखील दिली जाते. या सोबतच स्टेशनवर या मार्गदर्शक सूचनांसंबंधी फलक देखील लावले आहेत.

  ट्रेन, स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण
  सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. मेट्रोचे कर्मचारी हॅन्ड ग्लोव्ह , मास्क परिधान करून असतात. या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येते. प्रत्येक फेरीनंतर ट्रेन आतून निर्जंतुक करण्यात येते शिवाय. नियमितपणे मेट्रो डेपोमध्ये गेल्यानंतर आत-बाहेरून धुतली जाते.

  अश्या प्रकारे प्रवाश्यांच्या सुरक्षेकरता महा मेट्रो सर्व प्रकारची काळजी घेत आहे. या सर्व उपाय योजनांमुळे मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांचा विश्वास वाढत जाऊन आज मेट्रो प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. महा मेट्रो एकीकडे सर्व प्रकारच्या उपाय योजना करत असतानाच, मेट्रो प्रवाश्यांनी देखील सह-प्रवाश्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता या सर्व सूचना तसेच मानकांचे पालन करावे हे आव्हान करीत आहेत.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145