Published On : Tue, Jun 23rd, 2020

सार्वजनिक वाहतूक सीएनजी-एलएनजीवरच असावी : नितीन गडकरी

‘कमी प्रदूषण आणि टिकावू वाहतूक’ यावर ई संवाद


नागपूर: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता एलएनजी किंवा सीएनजीचा वापर आवश्यक झाला आहे. भविष्यात एलएनजी-सीएनजीचा वापर अधिक करावा लागणार आहे. पर्यावरण रक्षणाच्या आणि कमी प्रदूषणासाठी हे आवश्यक आहे. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘फिकी’च्या पदाधिकार्‍यांशी गडकरी ‘कमी प्रदूषण आणि टिकावू’ वाहतूक यावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. देशाच्या धोरणात बसणारी, अर्थव्यवस्थेला परवडणारी आणि पर्यावरण दूषित न करणारी अशी वाहतूक व्यवस्था ही आपल्या देशासाठी महत्त्वाची असल्याचे सांगून गडकरी म्हणाले- हवेतील आणि पाण्यातील प्रदूषणामुळे आज देशातील गरीब लोक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करीत आहे. शासनासमोरही ही समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. देशातील गरीबांना परवडणारी वाहतूक व्यवस्था असावी ही आपली गरज आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत डिझेल आणि पेट्रोलवरील बस न परवडणार्‍या असून पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, असे सांगत गडकरी म्हणाले- इलेक्ट्रिक बस, इथेनॉलवरील बस आणि बेस्टच्या मुंबईतील बस पाहता बेस्टची बस 115 रुपये किमी , इथेनॉलची बस 75 रुपये तर इलेट्रिकची बसला 50 रुपये किमीचा खर्च येतो. इलेक्ट्रिक बस ही एअर कंडीनशर असते. लंडन वाहतूक व्यवस्थेत असलेली इलेक्ट्रिक बस आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. त्या बसची कार्यक्षमताही अधिक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई-दिल्ली बस सीएनजीवर चालते. एकदा चार्ज केली 200 किमीपर्यंत चालते. त्यामुळे भविष्यात बस वाहतूक, सार्वजनिक वाहतूक ही एलएनजी किंवा सीएनजीवरच करावी लागणार आहे. कारण डिझेलपेक्षा स्वस्त पडते, असे सांगताना ते म्हणाले- डिझेलची बस आता सीएनजी व एलएनजीवर तंत्रज्ञानाद्वारे करता आली पाहिजे. नागपुरात अशा 100 बसेस चालतात. ओल्या-सुक्या कचर्‍यापासून इंधन निर्माण करून तेही सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता आले पाहिजे. नागपुरात हे प्रयोग सुरु आहेत. इथेनॉलचा वापर इंधनामध्ये करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इथेनॉलची निर्मिती वाढविणे व वाहतुकीसाठी त्याचा अधिक वापर करणे फायदेशीर ठरणार आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतुकीतीतील बसेस या इलेक्ट्रिकच्या असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.


डिझेल हे हानीकारक आहे टेलिकम्युनिकेशन टॉवरसाठीही डिझेल वापरले जाते. तेथेही एलएनजी किंवा सीएनजी वापरणे शक्य आहे. मोटारसायकल आणि कारही इलेक्ट्रिकवर चालणारी असावी. पण यासाठी लागणारे धोरण सध्या देशात नाही. परदेशात फ्लेक्सचे इंजिन कारमध्ये वापरले जाते, पण भारतात कंपन्यांनी अजून फ्लेक्सचे इंजिन वापरणे सुरु केले नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी काही प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारे तर काही न परवडणारे आहेत. 80 ते 90 टक्के प्रकल्प खाजगी गुंतवणुकीतून करावे लागणार आहेत. यासाठी अजून धोरण नाही. कोणत्याही धोरणाची अमलबजावणी करणे हे कठीण जाते. वाहतुकीचे धोरण हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे व टिकावू असले पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा विचार करूनच ते ठरले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.