Published On : Tue, Aug 18th, 2020

वाहतूक खर्चात बचत करण्यासाठीच चांगल्या महामार्गांची निर्मिती : नितीन गडकरी

‘बांधकाम, उपकरणे, तंत्र व घटक’ यावर आभासी प्रदर्शन

नागपूर: महामार्गांवरून होणार्‍या वाहतुकीत वेळेची बचत व्हावी आणि वाहतूक खर्चातही बचत व्हावी, तसेच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चांगल्या रस्त्यांची निर्मिती करीत असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग बांधकाम, वाहतूक आणि परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) बांधकाम, उपकरणे, तंत्र व घटक या विषयावरील आभासी प्रदर्शनात प्रमुख वक्ते म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमात संवाद साधत होते. सीआयआयचे प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी उच्च व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि वाहतूक खर्चात बचत या विषयावर अधिक भर दिला. ते म्हणाले- वाहतूक आणि उत्पादन खर्चात बचत झाली तरच कंत्राटदारांचा, उद्योजकांचा नफा वाढेल आणि ग्राहकांना स्वस्तात वस्तू उपलब्ध होतील. देशात विमानतळांची संख्या आता खूप झाली आहे. रेल्वेचे जाळे मोठे आहे, महामार्गांचे जाळेही मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. या स्थितीचा फायदा घेत वाहतूक खर्चात बचत करणे शक्य आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटीच्या पायाभूत सुविधांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आयात कमी, निर्यात अधिक करावी लागेल. मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाअंतर्गत या उद्योगासाठी लागणारी उपकरणे ही देशात तयार झाली पाहिजे. त्यासाठी नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे शक्य होऊ शकते, असेही ते म्हणाले.

अन्य देशांच्या तुलनेत भारतात वाहतूक खर्च हा 16 ते 18 टक्के आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सुमारे अडीचशे किमी जाण्यासाठी ट्रकने सीएनजी इंधन वापरावे आणि सात-आठशे किमी दीर्घ प्रवासासाठी एलएनजीचा वापर केला जावा. यामुळे इंधनात होणार्‍या खर्चातही बचत होईल. डिझेलच्या ट्रकचे एलएनजी इंधनावर चालणार्‍या ट्रकमध्ये रुपांतर केले जावे. उत्पादन खर्चात, वाहतूक खर्चात, इंधन खर्चात बचत करणे शक्य व्हावे, यासाठी मोठ्या महामार्गांची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. तसेच आयातीत मालाला पर्याय निर्माण करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला लागणारी उपकरणे आणि साहित्य देशात निर्माण होणे शक्य आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल तर निर्यात वाढविणे शक्य होईल. आगामी काळात आयातीत मालावर अधिक आयात शुल्क लावण्याचा शासनाचा विचार असल्याचेही ना. गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले.

सीआयआयने देशातील आयआयटी व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्याने संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरु करावी, असा मनोदय व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- या प्रकल्पासाठी सीआयआयला शासन मदत करण्यास तयार आहे. यामुळे या क्षेत्राला कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि नवीन संशोधनातून नव्या तंत्रज्ञानाचा विकास होईल. बांधकाम-उपकरणे-साहित्य निर्मिती या क्षेत्रासाठी असे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रात महामार्ग, पूल, उड्डाणपूल, सिमेंट रस्ते बांधताना शासनाने प्रिकास्ट तंत्रज्ञान स्वीकारले आहे. या तंत्रामुळे बांधकामासाठी येणार्‍या खर्चात 25 ते 30 टक्के बचत होते, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.