Published On : Tue, Oct 26th, 2021

व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग फायदेकारक : ना. गडकरी

Advertisement

नागपूर: कोणता व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे, याचा विचार करतानाच अर्थव्यवस्थेत सध्या महत्त्वाची बाब म्हणजे बदलते तंत्रज्ञान होय. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जेवढा कराल तेवढा फायदाच होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले..

वैश्य फेडरेशनच्या महासंमेलनाचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. एका आभासी कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले- ज्ञानाचे संपत्तीत आणि कचर्‍याचे संपत्तीत रुपांतर करणे हे आज देशासाठी आवश्यक आहे. आयात होणार्‍या वस्तूसाठी पर्याय निर्माण करून निर्यात वाढविणे, यामुळे व्यापार, व्यवसाय आपण यशस्वी रीत्या करू शकतो.

देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र हे सर्वात जास्त निर्यात करणारे क्षेत्र आहे. दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहने बनविणार्‍या हिरो, टीव्हीएस, बजाज या कंपन्या आपले 50 टक्के उत्पादन निर्यात करीत आहेत. आधुनिक व नवीन येणार्‍या तंत्रज्ञान या कंपन्यांनी स्वीकारल्यामुळे हे होत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जैविक इंधनात इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, एलएनजी व इलेक्ट्रिकवर देशात काम केले जात आहे. पेट्रोल डिझेलला पर्यायी, स्वदेशी, स्वस्त इंधन वापरले नाही तर 8 लाख कोटींची क्रूड तेलाची आयात येत्या काही काळात 25 लाख कोटींपर्यंत जाण्याची भीती आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

https://fb.watch/8T8TPoag70/

पेट्रोल-डिझेलच्या चढत्या भावांमुळे राज्य परिवहन महामंडळाची वाहने बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सार्वजनिक वाहतूक आता इथेनॉल, सीएनजी, एलएनजी व इलेक्टिकवर चालली पाहिजे. तसेच सौर, हायड्रो व पवन ऊर्जा ही हरित ऊर्जा अधिक तयार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यामुळे आयात कमी होईल. आज राष्ट्रीय ग्रीडमध्ये 36 टक्के सौर ऊर्जा आहे, ती भविष्यात 60 टक्के होईल, असे शासनाचे प्रयत्न आहेत. पेट्रोलवर चालणार्‍या वाहनांना फ्लेक्स इंजिन लावले तर 100 टक्के इथेनॉलवर ही वाहने चालतील आणि प्रदूषणही होणार नाही. बांधकाम क्षेत्रातील वाहनेही जैविक इंधनावर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. उद्योजकता वाढवा, उत्पादन खर्च कमी करा, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करा, रोजगार निर्माण करून निर्यात वाढवा यामुळे भारत देश आत्मनिर्भर बनेल, असेही ना. गडकरी म्हणाले.