
नागपूर: गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे आवाहन महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी परिस्थितीची जाणीव ठेवावी, अशी विनंती त्यांनी केली.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा देशातील मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात आंदोलन टाळणे राज्याच्या हिताचे आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे यांनी ओबीसी असो किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सातत्याने प्रयत्न केले असून, यापूर्वी न घेतलेले अनेक निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाल्याचा दावा त्यांनी केला.
मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार काम करत असून, सरकारला आवश्यक वेळ दिला पाहिजे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दुष्काळसदृश परिस्थिती सरकारसाठी प्राधान्याची
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना बावनकुळे यांनी सध्या कोणत्याही आंदोलनापेक्षा शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. राज्यातील सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, अनेक ठिकाणी पिके करपत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, पुन्हा बैठक घेऊन जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात आवश्यक मदत मिळावी आणि शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष पाहणी करणार असून, आपणही काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण अहवाल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणार आहे.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर पोलिसांची कडक नजर
दरम्यान, नागपूर शहरातील OYO हॉटेल्सबाबतही बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली. अशा हॉटेल्सच्या परिसरातील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या विषयावर पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती देण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले. OYO हॉटेल्ससाठी कडक नियमावली तयार करण्यात आली असून, हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची आवश्यक नोंद व रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई केली जाईल. नागपूर शहराची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा अबाधित राहावी, या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.




