
नागपूर : उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी पॉवरच्या कॉर्पोरेट रचनेत मोठा बदल होणार आहे. NCLTच्या मुंबई खंडपीठाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या (VIPL) अदानी पॉवरमध्ये विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी NCLTच्या अहमदाबाद खंडपीठाने अन्य नऊ पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती.
या प्रक्रियेनंतर एकूण १० कंपन्या अदानी पॉवरमध्ये विलीन होणार आहेत. यामध्ये अदानी पॉवर दहेज, कच्छ पॉवर जनरेशन, रिसर्जंट फ्युएल मॅनेजमेंट, महान फ्युएल मॅनेजमेंट, ओडिशा थर्मल एनर्जी, कोरबा पॉवर, अनुपपूर थर्मल एनर्जी एमपी, मिर्झापूर थर्मल एनर्जी यूपी आणि एम्बेरिझा इन्फ्रा पार्क या कंपन्यांचा समावेश आहे.
या विलीनीकरण योजनेची प्रभावी तारीख १ एप्रिल २०२५ ठेवण्यात आली आहे. उर्वरित प्रक्रियात्मक बाबी पूर्ण झाल्यानंतर योजना पूर्णपणे लागू होईल आणि त्याबाबत स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, नागपुरातील ६०० मेगावॅट क्षमतेचा VIPLचा औष्णिक वीज प्रकल्प आता अदानी पॉवरच्या मोठ्या ऊर्जा व्यवसायाचा भाग बनेल. या एकत्रीकरणामुळे कंपनीची कार्यक्षमता वाढवणे, व्यवस्थापन अधिक सुलभ करणे आणि कायदेशीर व अनुपालन खर्च कमी करणे हा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अदानी पॉवरच्या शेअरने गेल्या एका वर्षात ३३.८८ टक्के, तीन वर्षांत ३८.२५ टक्के, तर पाच वर्षांत ५९.७६ टक्के परतावा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.




