नवी दिल्ली : कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानीसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेच्या खिशातून 12 हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
अदानी जी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करतात आणि हा कोळसा भारतात पोहोचतो तेव्हा त्याची किंमत दुप्पट होते. अशाप्रकारे अदानी समूहाने भारतातील लोकांच्या खिशातून सुमारे १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. अदानी समूह कोळशाच्या वाढलेल्या किमती म्हणजेच ‘ओवरप्राइस’ दाखवतो, त्यामुळे विजेच्या किमती वाढतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
कर्नाटकात काँग्रेसने वीज सबसिडी दिली आहे, ती आम्ही मध्यप्रदेशात देणार आहोत, असे राहुल म्हणाले. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, भारतातील विजेच्या वाढत्या किमतींमागे अदानी समूहाचा हात असल्याचे आता ज्ञात होत आहे. भारतातील नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे की ज्या प्रकारे तुमचे वीज बिल वाढत आहे, 12000 कोटी रुपये थेट तुमच्या खिशातून अदानीजीने घेतले आहेत.
आपल्या आरोपांचा आधार घेत राहुल यांनी फायनान्शिअल टाईम्स लंडनच्या प्रसिद्ध अहवालाचा हवाला दिला. इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असेही त्यांनी म्हटले.
फायनान्शियल टाइम्सच्या अहवालात काय छापले आहे?
अदानी कोळसा आयातीचे रहस्य जे शांतपणे दुप्पट मूल्यात वाढले’ असे शीर्षक असलेल्या लंडनमधून प्रकाशित झालेल्या अहवालात असा आरोप करण्यात आला आहे की, फायनान्शिअल टाइम्सने तपासलेल्या सीमाशुल्क नोंदीवरून असे दिसून आले आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख खेळाडू असलेल्या अदानी समूहाचे बाजारावर वर्चस्व आहे. बाजारभावापेक्षा अधिक किमतीत अब्जावधी डॉलर्सचा कोळसा आयात केला. फायनान्शिअल टाईम्सच्या तपासणीनुसार, देशातील सर्वात मोठा खाजगी कोळसा आयातदार अदानी इंधनाच्या किमतीत वाढ करत होता, ज्यामुळे लाखो भारतीय ग्राहक आणि व्यवसायांना विजेसाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याच्या दीर्घकालीन आरोपांना ही आकडेवारी समर्थन देते.
अदानी समूहाने हे आरोप फेटाळले –
फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अदानी समूहाने म्हटले आहे की एफटीची कथा “जुन्या, निराधार आरोपांवर” आधारित आहे आणि “सार्वजनिकरित्या उपलब्ध तथ्ये आणि माहितीचे एक चतुर पुनर्वापर आणि निवडक चुकीचे वर्णन आहे.” एफटीच्या अहवालानुसार, सात वर्षांपूर्वी आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या भारतीय वित्त मंत्रालयाच्या तपास युनिट, महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या तपासणीत इंधनाच्या वाढत्या किमतीचा आरोप प्रथमच मांडण्यात आला होता.
एकाच कोळशाच्या वेगवेगळ्या किमती-
फायनान्शिअल टाईम्सने आपल्या अहवालात तपशिलवार तपासाचा हवाला दिला आहे. त्यानुसार, जानेवारी 2019 मध्ये, दक्षिण कोरियाचे मालक आणि पनामाचा ध्वज असलेले DL Acacia नावाचे 229 मीटर लांबीचे बल्क कॅरिअर इंडोनेशियातील कालीओरांग बंदरातून निघाले. हे जहाज भारतातील औष्णिक वीज प्रकल्पासाठी कोळशाने भरले होते. एफटीच्या अहवालानुसार, प्रवासादरम्यान काहीतरी विलक्षण घडले. झालं असं की या जहाजात भरलेल्या कोळशाची किंमत दुप्पट झाली. निर्यात रेकॉर्डमध्ये त्याची किंमत $1.9 दशलक्ष होती, स्थानिक खर्चासाठी $42,000 बाजूला ठेवले होते. एफटीचा आरोप आहे की अदानीद्वारे संचालित भारतातील सर्वात मोठे व्यापारी बंदर गुजरातमधील मुंद्रा येथे पोहोचल्यावर या कोळशाचे आयात मूल्य $4.3 दशलक्ष दाखवण्यात आले.
फायनान्शिअल टाईम्सचा दावा आहे की इंडोनेशियन रेकॉर्डनुसार, या 30 व्यवहारांमध्ये $139 दशलक्ष खर्चाचा 3.1 दशलक्ष टन कोळसा, तसेच इंडोनेशियाला $3.1 दशलक्षचा शिपिंग आणि विमा खर्च आला. मात्र भारतातील सीमाशुल्क अधिकाऱ्यांना या कोळशाची किंमत 215 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले. फायनान्शिअल टाईम्सने दावा केला आहे की, इंडोनेशियातून भारतात येणाऱ्या या कोळशातून ७३ दशलक्ष डॉलर्सचा नफा झाल्याचे दिसून येते.