नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (२ ऑक्टोबर) कोहळी गावात छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. या कारवाईत १६ हजार ४९० रुपयांचा दारू साठा हस्तगत करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, भाग्यश्री सुपर बाजारासमोरील त्रिवेणी उपहारगृहात एका व्यक्तीकडून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री केली जात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत छापा मारण्यात आला. आरोपीची ओळख संतोष धनराज झाडे (वय ३७, रा. वार्ड क्र. ०२, कोहळी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर) अशी झाली आहे.
त्याच्या दुकानातून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यामध्ये इम्पेरियल ब्लु, रॉयल स्टेज, तसेच देशी भिंगरी संत्रा या प्रकारातील २०२ बाटल्या मिळून आल्या. तपासणीदरम्यान झाकण उघडून पंचांना वास दिल्यानंतर त्या बाटल्यांत दारू असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीकडे दारू साठविण्यासाठी कोणताही कायदेशीर परवाना नसल्यामुळे माल जप्त करून त्याच्यावर दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज कृष्णाजी काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास कळमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.