Published On : Wed, Jul 14th, 2021

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

Advertisement

– आतापर्यंत ३९०४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१३ जुलै) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३९०४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,७८,८०,५००/- चा दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ९, धरमपेठ झोन अंतर्गत ३, नेहरुनगर झोन अंतर्गत ६ आणि लकडगंज झोन अंतर्गत १४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३३५७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ६७ लक्ष ८६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.