Published On : Fri, Dec 27th, 2019

जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास नव्या एजन्सीवर कारवाई

Advertisement

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचा इशारा

नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी दोन नवीन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. जुन्या एजन्सीमार्फत शहरात अनेक ठिकाणी कलेक्शन सेंटर तयार करण्यात आले होते. या कलेक्शन सेंटरवर दिवसभर अस्वच्छता असायची. त्यामुळे नवीन नियुक्त एजन्सींमार्फत हे कलेक्शन सेंटर बंद करण्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अजूनही जर जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास दोन्ही नव्या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला.

आरोग्य विभागच्या विविध विषयांच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे, सदस्य लहुकुमार बेहते, कमलेश चौधरी, संजय बुर्रेवार, सदस्या लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरीता कावरे, आशा उईके, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, टाटा ट्रस्टचे डॉ.टिकेश बिसेन यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी व ए.जी. एन्व्‍हायरो व बी.व्‍ही.जी. या दोन्ही एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत गाईचे गोठे असलेल्या ठिकाणी शेण, मलमूत्र उचलण्याबाबत जबाबदारी संदर्भात धोरण निश्चीत करणे, शहरातील लहान व मोठ्या जनावरांच्या अवैध कत्तलीबाबत धोरण निश्चीत करणे, सफाई कर्मचारी, जमादार स्वास्थ निरीक्षक, झोनल आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या साफ सफाईमध्ये संपूर्ण कार्यप्रणाली निश्चीत करण्याबाबत धोरणात्मक चर्चा, कचरा संकलनाच्या संदर्भात छोट्या व मोठ्या गाड्या स्लम वस्तीसाठी वाढविणे, मोकळया भूखंडावर कचरा किंवा घाण असल्यास विभागातर्फे कार्यवाही करणे, युपीएचसी व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्तापणे चालणा-या मनपा दवाखान्याचे कामकाज, आरोग्य विभागाचे औषधी भंडार कामकाज आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दोन्ही एजन्सीच्या कामाचा झोन निहाय आढावा घेतला. यापूर्वी कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटतर्फे शहरातील दहाही झोनमध्ये १०७ ठिकाणी कलेक्शन सेंटर तयार करण्यात आले होते. या कलेक्शन सेंटरवर नागरिकांकडून कचरा टाकला जायचा त्यामुळे परिसरात नेहमीच अस्वच्छता राहायची. नवीन एजन्सीतर्फे प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन सेंटर तयार करण्यात आले आहेत. जुन्या कलेक्शन सेंटरवर नेहमी स्वच्छता असावी यासाठी त्या ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर स्वच्छता दुताचे नाव व संपर्क क्रमांक टाकण्यात आले आहे. यानंतरही जर जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश त्यांनी दिले.

शहरातील रिकाम्या भुखंडांवर कोणतेही बांधकाम होत नसल्याने तिथे अस्वच्छता पसरविली जाते. वारंवार सफाई करूनही तिथे अस्वच्छता होतेच. याबाबत संबंधित भुखंड मालकाला नोटीस बजावून आवश्यक कारवाई करणे, तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पडीत शासकीय जमिनीवर काय सुधार योजना राबविण्यात येतील यासंबंधी झोनस्तरावर अहवाल सादर करा असेही निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

टाटा ट्रस्टप्रमाणेच मनपाचे ५ रुग्णालय तयार करा
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या १८ रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टचा करार मार्च २०२० पर्यंत असून ट्रस्टद्वारे एकूण २६ रुग्णालय व्यवस्था सुधारण्यात येणार होती. त्यापैकी १८ रुग्णालय पूर्ण झाले तर इतर ८ रुग्णालयांबाबत आवश्यक कार्य सुरू आहे. टाटा ट्रस्टद्वारे मनपाच्याच आरोग्य कर्मचा-यांद्वारे आरोग्य सुविधा सुधारण्यात आली आहे. त्यामुळे याचा अवलंब करीत मनपाचे इतरही रुग्णालय अद्ययावत होणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाद्वारे येत्या वर्षभरात मनपाची किमान पाच रुग्णालये टाटा ट्रस्टच्या धर्तीवर तयार करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच आरोग्य समितीच्या पुढील बैठकीत या पाच नागरी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रांची यादी समितीपुढे सादर करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

धोरणात्मक निर्णयाबाबत महापौरांना अहवाल सादर करणार
गाईचे गोठे असलेल्या ठिकाणी शेण, मलमूत्र उचलण्याबाबत जबाबदारी संदर्भात धोरण निश्चीत करणे, शहरातील लहान व मोठ्या जनावरांच्या अवैध कत्तलीबाबत धोरण निश्चीत करणे, सफाई कर्मचारी, जमादार स्वास्थ निरीक्षक, झोनल आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या साफ सफाईमध्ये संपूर्ण कार्यप्रणाली निश्चीत करणे या विषयावर धोरणात्मक निर्णयासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. तिन्ही विषयांच्या अनुषंगाने सदस्यांच्या आवश्यक सुचनेनुसार येत्या ३० डिसेंबरला धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर यासंबंधीचा अहवाल महापौरांकडे सादर करण्यात येईल, असे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.