नागपूर : शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलत २४ ऑटो रिक्षा आणि ४६ ई-रिक्षा जप्त केल्या आहेत. ही कारवाई नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा जप्त करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसविणे आणि चालकांनी गणवेश न घालणे. तर ई-रिक्शा जप्त करण्यामागे दोन मुख्य कारणं पुढे आली आहेत. एक म्हणजे ई-रिक्शांचा वापर अवैध मालवाहतूक करण्यासाठी करण्यात येणं आणि दुसरं म्हणजे या रिक्षांचा बंदी असलेल्या मार्गांवर व महामार्गांवर वापर.
प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत चालक नियमांचं पालन करत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. सर्व ऑटो रिक्षा चालकांना गणवेश परिधान करण्याचं आणि केवळ परवानगी प्राप्त क्षमतेनुसारच प्रवासी नेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, ई-रिक्शा चालकांना मालवाहतुकीसाठी रिक्षाचा वापर करू नये आणि ठरवलेल्या मार्गांवरच वाहन चालवावं, असं आवर्जून सांगण्यात आलं आहे.
वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभागाच्या विशेष पथकांकडून सातत्यानं शहरात निरीक्षण केलं जात आहे.