नागपूर : राज्यात शिक्षक भरतीवर २०१२ पासून असलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवरही बनावट शालार्थ आयडीद्वारे मोठ्या प्रमाणात बोगस नियुक्त्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने अखेर विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
या त्रिसदस्यीय समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारून आतार यांचाही या पथकात समावेश आहे. या समितीला तीन महिन्यांच्या आत आपला सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे.
मुंबई, नागपूर, नाशिक, बीड, लातूर, जळगाव अशा विविध भागांत शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बनावट भरतीचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप किती खोलवर आहे, हे तपासातून समजून येणार आहे.
तपासातील प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे असतील –
सर्व शाळांतील कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तपासणे
नियुक्ती मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी शोधून सुधारणा सुचवणे
२०१२ नंतर झालेल्या सर्व बनावट भरतींचा शोध घेणे
दरम्यान, नागपूरमध्ये या प्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, २० पेक्षा अधिक संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. त्याचबरोबर राज्य पोलीस विभागानेही एक स्वतंत्र एसआयटी तयार केली असून, उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली त्याचे काम सुरू आहे.
या घोटाळ्याची खोली पाहता, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.