Published On : Fri, Jul 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई; हत्येनंतर उमरेडमधील दोन कुख्यात गुंडांवर मकोका!

Advertisement

नागपूर : उमरेड परिसरात संघटित गुन्हेगारीद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या दोन कुख्यात गुंडांविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल ऊर्फ जानी ऊर्फ सोहेब सईद शेख (23, रा. कावरापेठ, उमरेड) आणि पप्पू ऊर्फ प्रफुल ज्ञानेश्वर गायधने (25) हे दोघे संघटित टोळी तयार करून परिसरात हत्या, जीवघेणे हल्ले तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होते. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 24 मे 2026 रोजी रात्री उमरेडमधील कावरापेठ परिसरात किरकोळ वादातून दोन्ही आरोपींनी राजकुमार मारोती पवार (50, रा. बैतूल, मध्य प्रदेश) यांच्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

तपासात आरोपी संघटित पद्धतीने गंभीर गुन्हे करत परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये कोणतीही घट झाली नव्हती.

Advertisement

या सर्व बाबींचा विचार करून उमरेड पोलिसांनी दोन्ही आरोपींवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर दोघांविरुद्ध मकोकाच्या कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असे नागपूर ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.