Published On : Fri, Jul 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांसाठी प्रेरणेची पर्वणी;’जीवन उत्सव’ वेब सिरीजचा शुभारंभ

Advertisement

नागपूर : नागपूरचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विलास काळे यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी भेट म्हणून ‘जीवन उत्सव – अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ’ या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि आनंदी कसे जगावे, याचा संदेश देणारी ही वेब सिरीज आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या मालिकेत विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी संवाद साधून जीवनातील अनुभव, संघर्ष आणि यशाच्या प्रेरणादायी कथा मांडण्यात येणार आहेत. कला, संगीत, रंगभूमी, संस्कृती, प्रवास, व्यक्तिमत्त्व विकास, प्रशिक्षण आणि अध्यात्म अशा विविध विषयांवर आधारित अनुभवकथन या मालिकेतून सादर केले जाणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात ‘किस्से मेरे अनुभवों के’ या २० भागांच्या विशेष मालिकेने होत आहे. ज्येष्ठ प्रसारक, रेडिओ उद्घोषक आणि सूत्रसंचालक किशन शर्मा आपल्या आयुष्यातील संस्मरणीय अनुभव शुभांगी रायलू यांच्याशी संवादातून उलगडणार आहेत.

नागपूरशी घट्ट नाळ असलेल्या किशन शर्मा यांनी विविध भारतीमध्ये तब्बल २७ वर्षे सेवा बजावत ‘छायागीत’, ‘बेला के फूल’ आणि ‘भुले बिसरे गीत’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी, राज कपूर, कवी प्रदीप, आशा भोसले, शंकर-जयकिशन आणि विनोबा भावे यांच्यासोबतच्या त्यांच्या अविस्मरणीय भेटी आणि अनुभव या मालिकेतून उलगडणार आहेत.

Advertisement

या वेब सिरीजचे संपूर्ण चित्रीकरण नागपूरच्या सीताबर्डी येथील फॉर्च्यून मॉलमधील ‘द बुटी हाऊस स्टुडिओ’ येथे करण्यात आले आहे. स्टुडिओचे संचालक आदित्य बुटी आणि त्यांच्या चमूने चित्रीकरण, निर्मिती, संकलन आणि पोस्ट-प्रॉडक्शनची जबाबदारी पार पाडली.

या वेब सिरीजच्या शुभारंभानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला विलास काळे, प्रीती बुटी, आदित्य बुटी, किशन शर्मा आणि शुभांगी रायलू उपस्थित होते. ‘जीवन उत्सव’ ही वेब सिरीज यूट्यूबवर उपलब्ध असून नागपूरसह राज्यभरातील प्रेक्षकांना प्रेरणादायी अनुभवांचा अनोखा प्रवास अनुभवता येणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.