Published On : Mon, Mar 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर गुन्हे शाखेची कारवाई; भारत–न्यूझीलंड टी-२० अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक!

Advertisement

नागपूर– भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ICC Men’s T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर नागपूर गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना रंगेहात अटक करण्यात आली असून सुमारे १ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. ८ मार्च रोजी रात्री ९.२० ते ९ मार्च रोजी पहाटे १२.२० या दरम्यान मनकापूर पोलीस ठाणे हद्दीतील ठाकरे लेआउट, गीतानगर परिसरातील फारस चौकाजवळील एका घरावर छापा टाकण्यात आला. संबंधित घराच्या वरच्या मजल्यावरून क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवला जात असल्याचे उघड झाले.

Gold Rate
Mar 9, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,400/-
Gold 22 KT ₹ 1,49,200 /-
Silver/Kg ₹ 2,62,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यामध्ये पोलिसांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांकडून सट्टा स्वीकारताना दोन आरोपींना रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चैतन्यकुमार गंगाराम ठाकरे (५५, रा. खापरी मोहल्ला, इतवारी पोस्ट ऑफिसजवळ) आणि पुरुषोत्तम दशरथ सोनकुसरे (५३, रा. प्लॉट क्रमांक १००, अनमोल नगर, वाठोडा) अशी आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक दूरचित्रवाणी संच, विविध कंपन्यांचे १० मोबाईल फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण १ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीदरम्यान आरोपींनी ही सट्टेबाजीची कारवाई संजू रामटेकेकर, हेमराज नामदेवराव कोहाड (दोघेही रा. श्रीकृष्ण नगर, नंदनवन) आणि अविनाश खडके (रा. लालगंज, चाकणा चौक, नागपूर) यांच्या मदतीने चालवत असल्याची कबुली दिली. हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी मनकापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र गॅम्बलिंग ॲक्टच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश सागडे, उपनिरीक्षक अमित देशमुख, संतोष सिंह ठाकूर, अजय पाटील, अनुप तायवाडे, विवेक भोयर, रोहित काळे, मनीष रामटेके आणि प्रमोद देशभ्रतार यांच्या पथकाने केली. ही मोहीम नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी , अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी , उपायुक्त (शोध) राहुल माखनिकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement