
नागपूर-भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. विपिन यांनी सोमवारी नागपूर महानगरपालिकेच्या ५२ व्या आयुक्तपदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी प्रशासकीय इमारतीत हा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला.
पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त वासुमना पंत तसेच अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी डॉ. विपिन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मागील आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विपिन यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. विपिन हे २०१४ तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय शाखेतून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते नागपूरचे जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारीही सांभाळत आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. विपिन यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच इतर विभागप्रमुखांसोबत शहरातील सुरू असलेल्या विकासकामांबाबत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत चर्चा केली.
नवीन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.








