Published On : Mon, Mar 12th, 2018

एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई – रामदास कदम

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरामध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर कारवाई करण्यासाठी लवकरच कोस्टलच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

ते आज रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांच्या प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मासे नष्ट होत आहेत. अशा मच्छिमारीवर बंदी आणली नाही तर भविष्यात मासे मिळणार नाहीत. आपल्याला केरळ आणि कर्नाटक राज्यावर अवलंबून रहावे लागेल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

श्री. जानकर म्हणाले, मासेमारी करणाऱ्यांना शेतकऱ्यांसारखा कृषीचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. डिझेल परताव्याचे आत्तापर्यंत 42 कोटी रुपये मच्छिमारांना दिले असून आणखी 200 कोटी रुपयांची गरज आहे. त्यात ओखी वादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांनाही मदत करायची आहे. काही मच्छिमार सोसायट्यांना मदत केली आहे. डिझेलअभावी ज्या बोटी समुद्रात मच्छिमारीसाठी उतरल्या नाहीत, त्यांनाही लवकरच अनुदान दिले जाईल. एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी स्थानिक मच्छिमारांची मदत करुन त्यांना कोस्टल अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला आमदार अशोक पाटील, आमदार श्रीमती भारती लव्हेकर तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.