| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Oct 16th, 2019

  विना परवानगी सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणा-या ७०५९ जणांवर कारवाई

  मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : सर्वाधिक प्रकरण आसीनगर झोनमध्ये


  नागपूर : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणे व प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देउनही न हटविल्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ७०५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील पथकाद्वारे सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणे व प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देउनही न हटविणा-या ६९३० व्यक्तींवर व १२९ बिल्डर्सवर अशा एकूण ७०५९ जणांवर कारवाई करण्यात आली.

  मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करुन स्वच्छ, सुंदर शहर संकल्पनेमध्ये अडसर निर्माण करणा-यांना अंकुश लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक कार्य करीत आहे.

  उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणे व प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देउनही न हटविणा-या ६९३० व्यक्तींवर कारवाई करुन १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपये तर १२९ बिल्डर्सवर कारवाई करुन ८ लाख २९ हजार रुपये असे एकूण १ कोटी २५ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.

  झोननिहाय कारवाई
  उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक १११९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणे व प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देउनही न हटविणारे १११४ व्यक्ती व ५ बिल्डर्सचा समावेश आहे.

  नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
  नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातीप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145