Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राची AI क्षेत्रात मोठी झेप; पुण्यात विकसित झाली ‘अचूक’ AI प्रोग्रामिंग भाषा

Advertisement

पुणे : महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरेल अशी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पुण्यातील LambdaQ Labs या कंपनीने ‘Achuk (अचूक)’ ही नवीन ओपन-सोर्स AI प्रोग्रामिंग भाषा विकसित केली असून ती अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. AI ने तयार केलेल्या कोडमधील चुका तात्काळ ओळखून चुकीचा कोड नाकारण्याची क्षमता या भाषेमध्ये असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सध्या AI च्या मदतीने प्रोग्रामिंग करताना अनेकदा वरवर योग्य वाटणारा, मात्र प्रत्यक्षात त्रुटी असलेला कोड तयार होतो. ‘अचूक’ ही भाषा AI ने लिहिलेल्या प्रत्येक कोडची पडताळणी करते आणि त्रुटी आढळल्यास तो कोड स्वीकारत नाही. त्यामुळे वापरकर्त्यांना अधिक विश्वासार्ह आणि अचूक कोड मिळण्यास मदत होते, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, एका AI मॉडेलने ‘अचूक’ भाषेत ९४ टक्के अचूक कोड तयार केला. त्याच मॉडेलची Python मध्ये ५६ टक्के, तर Go मध्ये केवळ ७ टक्के अचूकता नोंदवली गेली. हे निकाल इच्छुकांना स्वतः पडताळून पाहता येतील, असा दावा करण्यात आला आहे.

‘अचूक’ ही भाषा पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली असून तिला मराठी नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी केवळ २ डॉलर (सुमारे १७० रुपये) खर्च आल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही भाषा पूर्णपणे मोफत आणि ओपन-सोर्स असून तिच्यासोबत इंटरनेटशिवाय कोणत्याही लॅपटॉपवर चालणारे AI मॉडेलही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Advertisement

या नव्या तंत्रज्ञानामुळे AI आधारित सॉफ्टवेअर विकास अधिक विश्वासार्ह होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पाची अधिक माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर आणि GitHub रिपॉझिटरीवर उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.