नागपूर : शहरातील मानकापूर परिसरात दुकानदारांना धमकावत खंडणी मागणाऱ्या करण उर्फ रोहित पुरषोत्तम नोकरीया (वय २२) या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. तो इन्गोळे लेआउट, मानकापूर येथे राहणारा आहे. मंगळवारी, १३ मे रोजी संध्याकाळी ८.३० वाजता, तो विकास भवनाजवळील आशा एंटरप्रायझेस या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चाकू घेऊन घुसला आणि दुकानदार दीपक मनमोडे यांना दर महिन्याला ५,००० खंडणी देण्याची धमकी दिली. त्याने स्वतःला “करण नोकरीया” म्हणून ओळख दिली. माझ्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत, पैसे दिले नाहीत तर परिणाम भोगावे लागतील,असे सांगितले. त्याने इतर दुकानदारांनाही चाकू दाखवून धमकावले.
याआधी, ४ जानेवारी २०२५ रोजी, त्याने दोन साथीदारांसह याच दुकानातून चाकूच्या धाकाने ५०० रुपये लांबवले होते. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याकडून लोखंडी चाकू आणि ५०० रोख जप्त करण्यात आले. त्याच्यावर BNS कलम ३०८(४), ३०९(४), २९६, ३(५) आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे मानकापूर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई करून आरोपीला अटक केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.