नागपूर – सीताबर्डी पोलीस ठाण्यात गांजाची तस्करी सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी वारंवार दिलेल्या चेतावणीनंतरही गांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात ढिलाई दाखवल्यामुळे डीबी शाखेतील दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आठ पोलिस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सीताबर्डी येथील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये गेल्या काही काळापासून उघडपणे मादक पदार्थांची विक्री सुरू होती. स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार या संदर्भात तक्रारी करत पोलिस आणि तस्करांमधील संगनमताचा आरोप केला होता. त्यामुळेच पोलिस आयुक्तांकडे थेट तक्रार करण्यात आली.
सुमारे आठवडाभरापूर्वी सीताबर्डी पोलिसांनी केवळ दिखावा म्हणून छापा टाकला होता, मात्र त्यात कोणताही तस्कर पकडला गेला नव्हता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डीसीपी राहुल मदने यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने तेलीपुरा भागातील अरुंद गल्ल्यांमध्ये छापा टाकला. यावेळी स्नेहल लखनलाल चौरसिया हा गांजा विकताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याकडे दोन पिशव्यांमध्ये गांजा सापडला. याच कारवाईत आणखी २३ जणांना गांजा घेताना पकडण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ पातळीवरून गांजासारख्या गुन्ह्यांविषयी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.