Published On : Wed, Oct 31st, 2018

जनसेवेचा वसा आयुष्याच्या उत्तरार्धातही स्वीकारावा : रवींद्र ठाकरे

नागपूर : आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात जनसेवेचे कार्य करून आपल्या कार्याची छाप जनमानसावर सोडणारे अधिकारी फार थोडे असतात. उपायुक्त रवींद्र देवतळे आणि सहायक आयुक्त राजेश कराडे हे अशाच अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आयुष्याच्या उत्तरार्धातही जनसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवावे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र देवतळे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या स्वेच्छानिवृत्ती आणि नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्यासह मनपाच्या १८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. ३१) मनपाच्या वतीने निरोप देत सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित या सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, सत्कारमूर्ती उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, सत्कारमूर्ती सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, नागपूर महानगरपालिकात कार्य करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना ताण असतो. मात्र याठिकाणी या दोन्ही अधिकाऱ्यांनी आनंदाने कार्य केले. आपल्या कार्यातून इतरांनाही आनंद दिला. आपली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. हसतखेळत काम करण्याची कला त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे, या शब्दात त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव केला.

अपर आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरवोल्लेख करीत त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त महेश मोरोणे, अशोक पाटील यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना उपायुक्त रवींद्र देवतळे म्हणाले, आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक बरे-वाईट अनुभव आले. मात्र या अनुभवातून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळाले.

आपल्या कार्याच्या जोरावरच आजही राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिकांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी आपले स्नेहबंध असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संपूर्ण वेळ कुटुंब आणि समाजकार्यासाठी देणार असल्याचेही ते म्हणाले. सहायक आयुक्त राजेश कराडे यांनी आपल्या सेवाकार्यातील चढउताराचे अनुभव मांडले. नागपूर महानगरपालिकेतील कार्याने आपल्याला नवी ओळख दिली. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हा अनुभव आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगात येईल, असे भावुक उद्‌गार त्यांनी काढले.

तत्पूर्वी प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अन्य सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व सेवानिवृत्तांना शाल, श्रीफळ, तुळशी रोप, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्यांमध्ये राजस्व निरीक्षक चित्रा कुलकर्णी, राजस्व निरीक्षक टी.के. टाकळखेडे, एस.आर.पाटील, कमलाकर दांडेकर, डी.के. साखरकर, पी.एन. तापस, संजय कळमकर, दौलत कांबळे, आर.बी. कुर्वे, डी.डी. निकोसे, एच.पी. नरड, एच.टी. काळे, आर.आर. मडावी, दिलीप मलीक, मीरा दाबोडे, भीमराव गजभिये यांचा समावेश आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, राजेंद्र राहाटे, अविनाश बाराहाते, प्रदीप राजगिरे, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, अशोक पाटील, राजू भिवगडे, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, स्मिता काळे, सुवर्णा दखने, महेश मोरोणे, गणेश राठोड, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, डॉ. प्रदीप दासरवार, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक अजय माटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, डी.डी. जांभूळकर, मो. ईसराईल, दिलीप तांदळे, राष्ट्रीय एम्प्लॉइज कर्मचारी असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, मनोज कर्णिक, डोमाजी भडंग, कांचन क्षिरसागर, कुंदा राउत, एस्तर शिंदे, कमल भगत आदी उपस्थित होते. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.