Published On : Tue, Jun 9th, 2020

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या;

भूमिगत विद्युत वाहिन्या, बंधारे, निवारे प्राधान्याने उभारणार

मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश


मुंबई: जागतिक बँकेच्या सहायाने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (NCRMP) या अंतर्गत 397.97 कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सुरु असून ती युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी ही कामे त्वरित सुरु करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

जागतिक बँकेच्या सहायाने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल सायक्लोन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी या प्रोजेक्टच्या अंतर्गत समुद्र किनारीच्या जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे यावर भर दिला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील 203.77 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व नियोजित भूमिगत विद्युत वाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामूळे अतिरिक्त भूमिगत विद्युतवाहिन्यांची कामे करण्याकरिता 390 कोटी रुपयांना तत्वता मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मालवण 90 कोटी, अलिबाग 25 कोटी, रत्नागिरी 200 कोटी आणि सातपाडी साठी 35 कोटी रुपये विद्यमान कामांना वाढविण्यास तत्वता मान्यता दिली आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गतच खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीही 55.22 कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नारवेल बेनवले साठी 44.40 कोटी, कचली पिटकरी 10.82 कोटी देण्यात आले आहेत.

आपत्तीपूर्व प्रणाली साठी (EWDS) 53 कोटी रुपये देण्यात आले असून या प्रोजेक्ट अंतर्गत आपत्तीपूर्व प्रणालीची निविदा प्रकाशित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

११ ठिकाणी निवारे उभारणार

किनारपट्टीच्या भागात ११ निवारे सध्या उभारण्यात येणार आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. याशिवाय ३० निवारे आवश्यक असून त्यासाठीही तरतूद उपलब्ध करून घेण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

*सिमेंटचा स्लॅब*

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले व ती उडून गेली. परंतु कौलारू घरे शाबूत राहिली. आता जी घरे पूर्ववत उभी करायची आहे त्यावर पक्का सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली.

वीज पडून नुकसान टाळण्यासाठी

वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वारंवार वीज पडण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये लाइटनिंग अरेस्टर बसविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

कोकण किनारपट्टीला नेहमी चक्रीवादळांचा धोका असतो. कोकण किनारपट्टीवरिल सर्व जिल्ह्यांसाठी चक्रीवादळापासून संरक्षणासाठी जे जे प्रकल्प आणता येतील ते आणले जातील. जागतिक बँकेच्या सहायाने सध्या सुरु असलेले विविध प्रोजेक्ट त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.