वर्धा: उच्च शिक्षणात गुणवत्ता सुधारणे हे आजचे मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ताळमेळ साधून काम करावे लागेल. अकादमिक नेतृत्व करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने समर्पित होवून काम केले तर शिक्षणात आमूलाग्र परिवर्तन होवू शकते असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी केले. अकादमिक नेतृत्व व शैक्षिक प्रबंधन केंद्र, अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय, अलीगढ़ तथा पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण मिशन, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार प्रायोजित उच्च शिक्षा संस्थांचे कुलगुरु, प्रकुलगुरु, अधिष्ठाता तसेच प्राचार्यांकरिता चार दिवसीय (1 ते 4) प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन हिंदी विश्वविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विशिष्ट अतिथी म्हणून प्रो. जनक पांडे यांच्यासह प्रो. आनंद वर्धन शर्मा, प्रो. के. के. सिंह, प्रो. गोपाल कृष्ण ठाकुर, डॉ. शिरीष पाल सिंह मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध विश्वविद्यालये, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांचे अधिकारी आणि प्राचार्य सहभागी झाले.
प्रो. जनक पांडे म्हणाले की शिक्षणात विश्वास हाच आधार आहे. शिक्षकाचा विद्यार्थ्यावर आणि विद्यार्थ्याचा शिक्षकावर विश्वास असेल तर शिक्षणात परिवर्तन होवू शकते. यामुळे गुणवत्ताही वाढू शकते. विद्यार्थी , शिक्षक आणि समाज यांच्यातील संबंध मूल्यांवर आधारित असावे. गुणवत्तेशी तडजोड टाळली तर आम्ही अपेक्षित लक्ष्य गाठू शकू असेही ते म्हणाले. यावेळी प्रो. आनंद वर्धन शर्मा, प्रो. के. के. सिंह यांनीही विचार मांडले.
स्वागत भाषण प्रो. गोपाल कृष्ण ठाकुर यांनी केले. डॉ. शिरीष पाल सिंह यांनी रूपरेषा सादर केली. संचालन डॉ. भरत पंडा यांनी केले तर आभार डॉ. शिल्पी कुमारी यांनी मानले.

