Published On : Sun, Sep 3rd, 2017

‘आपली बस’च्या वाहकाचे महिलेशी गैरवर्तन

Aapli Bus
नागपूर:
‘आपली बस’मधून प्रवास करीत असलेल्या महिलेशी वाहकाने गैरवर्तन केले. महिलेने आपल्या पतीला घटनेची माहिती दिली. पती धंतोली ठाण्यात पोलिस कॉन्सटेबल आहे. पोलिसात असलेल्या पतीने वाहकाला चांगलेच बदळत ठाण्यात आणले. याबाबत माहिती मिळताच ‘आपली बस’च्या चालक आणि वाहकांमध्ये खळबळ उडाली. वाहकाला मारहाण केल्याच्या कारणातून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. दुपारनंतर बसांचे चाक थांबल्याने सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. धंतोली पोलिसांनी बस वाहक अशोक लक्ष्मण वाळूरकर (37) विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. तो आपली बस चालवणाऱ्या युनिटी कंपनीचा कर्मचारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय पीडित महिला सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास सातगाव जाण्यासाठी पंचशील चौकातून बुटीबोरीकडे जाणाऱ्या बस क्र. एमएच-31/सीए-6084 मधून प्रवास करीत होती. यावेळी बसमध्ये खूपच गर्दी होती. पीडितेला अचानक धक्का लागला. तिने मागे वळून बघितले असता बस वाहक अशोक दिसला. महिलेला वाटले की गर्दीत चुकीने तिला धक्का लागला असेल. यानंतर अशोकने पुन्हा महिलेशी गैरवर्तन केले. पीडितेने धंतोली ठाण्यात कार्यरत आपल्यात पतीला घटनेची माहिती दिली. पती आपल्या सहकाऱ्यासह रहाटे कॉलनी चौकात पोहोचला. बस येताच त्याने अशोकला खाली उतरून सोबत चालण्यास सांगितले.

मारहाणीचा मॅसेज झाला व्हायरल
अशोकने कारण विचारले असता आधीच संतापात असलेल्या कर्मचाऱ्याने त्याच्या कानशिलात लगावल्या. जबरीने त्याला बसमधून खाली उतरवले. यावेळी आपली बसची एक महिला कर्मचारीही बसमध्ये होती. तिने वाहकाला झालेल्या मारहाणीची माहिती आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. पाहता-पाहता मॅसेज पसरू लागला. बस चालक आणि वाहकांनी प्रवाशांना निश्चित स्थानांवर सोडून सेवा बंद केली. सर्व मोठ्यासंख्येने धंतोली ठाण्यात पोहोचले आणि वाहकाला अटकेच्या विरोधात ठाण्याला घेराव घातला. धंतोलीच्या पोनि सीमा मेहंदेले यांनी त्यांना महिलेच्या तक्रारीबाबत सांगितले आणि कायद्यान्वये कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बस कर्मचाऱ्यांनी मारहाणीबाबत नाराजगी व्यक्त केली. तणावाचे वातावरण पाहता एसीपी राजेंद्र बोरावके आणि अंबाझरीचे ठाणेदार बी.एस. खंदाले आपल्या पथकासह ठाण्यात पोहोचले. बस कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले.

गर्दीत कसे होऊ शकते गैरवर्तन
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जनरल कामगार युनियन (स्टार बस कर्मचारी संघटना) चे सचिव अंबादास शेंडे आणि भाऊराव रेवतकरही धंतोली ठाण्यात पोहोचले. शेंडे यांनी सांगितले की, बुटीबोरीकडे जात असलेली बस प्रवाशांनी भरलेली होती. बसच्या गेटपर्यंत प्रवासी होते. इतक्या गर्दीत एखादा वाहक कसा कोणत्या महिलेची छेड काढू शकतो. वाहकाच्या एका हातात तिकिटाची मशीन असते आणि दुसऱ्या हातात पैशांची बॅग. अशात महिलेशी असभ्य वर्तन करणे शक्यच नाही. जर महिलेने तक्रार केली होती तर त्याच्यावर कायद्याने गुन्हा नोंदवून अटक करावयास पाहिजे होती. महिलेचा पती पोलिस कर्मचारी होता म्हणून नागरिकांमध्ये वाहकाला मारहाण करण्यात आली. त्याला रस्ताभर मारहाण करीत ठाण्यात आणण्यात आले. हे चुकीचे आहे. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिले होती. मात्र तपास केल्याशिवाय अशा प्रकारचा व्यवहार करणे चुकीचे आहे. पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई न झाल्यास आम्ही बस चालवणार नाही. सर्व बसांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.