नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दीपके आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी विमानात जाऊन ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईमुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे शनिवारी सकाळी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले होते. सकाळी सुमारे 10.45 वाजता त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी विमानात प्रवेश करत तिघांनाही ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दीपके यांनी सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला.
दीपके आणि त्यांचे सहकारी दिल्लीला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती असून, कोणत्या ठाण्यात नेले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेत्यांना ताब्यात घेतले असले तरी जंतरमंतरवरील आंदोलन सुरू राहणार असल्याचे सीजेपीच्या सूत्रांनी सांगितले.
500 कार्यकर्त्यांची धरपकड; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मागील दिवसापासून सीजेपीच्या सुमारे 500 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
मंडी हाऊस मेट्रो स्थानकाबाहेरील सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. तसेच दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, आंदोलनाला परवानगी मिळणार की पोलिसांची कारवाई सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




