Published On : Sun, Sep 29th, 2019

शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या संभाव्य युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तसेच दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादीदेखील जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधीच शिवसेनेने काही आमदारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे.

शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप
शनिवारी उद्धव ठाकरे यांनी २८८ जागांवरील इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेऊन युती होणारच असे सांगितले होते. मात्र त्याआधीच तब्बल ९ आमदारांना ‘मातोश्री’वर एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे पुन्हा एकदा युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर जिथे युतीमध्ये वाद नाहीत, ज्या जागा शिवसेनेच्याच आहेत, फक्त त्याच जागावरील उमेदवारांना एबी फॉर्म दिले असल्याची माहिती शिवसेनेकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी संजय शिरसाट, सावंतवाडी मतदारसंघासाठी दीपक केसरकर तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहाही आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच दापोली, खेड, मंडणगड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार योगेश कदम यांनादेखील एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. नाशिकमधून सिन्नरचे आमदार पराग वाजे, देवळालीचे योगेश घोलप आणि निफाडचे अनिल कदमदेखील मातोश्रीकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे.

युती-आघाडीमध्ये चर्चांचे सत्र
आज घटस्थापनेचा मुहूर्त आहे. २०१४ रोजी घटस्थापनेच्याच दिवशी शिवसेना-भाजपा युती तुटल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच आघाडीनेही आपली आघाडी तोडली होती. सध्या युती-आघाडीमध्ये चर्चांचे सत्र सुरू आहे. मात्र त्याआधीच शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.