नागपूर – वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव रोडवरील एका देशी दारू भट्टीत किरकोळ वादातून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. काचेचा ग्लास फुटल्याच्या कारणावरून भट्टीतील कर्मचाऱ्यांनी त्याला इतकी अमानुष मारहाण केली की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली आहे आणि अधिक तपास सुरू आहे.
मृत युवकाचे नाव सूरज भलावी असून तो सोनबानगर परिसरात राहत होता. तो एका ऑनलाइन ग्रोसरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत होता. सूरजच्या लहान भावाने, सौरभ भलावीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपासून सूरज भट्टीतील कर्मचाऱ्यांशी सतत वाद घालत होता. त्याच्यावर डकैती, घरफोडी आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत तीन गुन्हे नोंद आहेत. तरीही तो खडगाव रोडवरील सायरे देशी दारू भट्टीत नेहमी दारू प्यायला जात असे.
घटनेच्या दिवशी रात्री सूरज नेहमीप्रमाणे भट्टीत गेला होता. नशेत असताना त्याच्या हातून काचेचा ग्लास फुटला. यावरून व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला झापले. त्यावर सूरजने शिवीगाळ करत वाद घातला. वाद इतका वाढला की कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापकाने मिळून त्याला जबर मारहाण केली. सूरज बेशुद्ध पडल्यावर आरोपींनी त्याला जवळच्याच झुडपात, नाल्याजवळ फेकून दिले.
घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. त्याचा भाऊ सौरभला सूरज झुडपात पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. गंभीर अवस्थेत सूरजला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सौरभच्या तक्रारीवरून नऊ आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.