
नागपूर : माणसांच्या जगात भावना फक्त माणसांनाच असतात, असं आपण अनेकदा मानतो. मात्र नागपुरात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने या समजुतीला छेद दिला. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माकडीण आणि तिच्या पिलाला अंतिम निरोप देण्यासाठी त्यांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या पथकाला बंदरांच्या झुंडाने चक्क रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्या साथीदारांना आपल्यापासून दूर जाऊ देण्यास हा झुंड तयार नव्हता.
सोमवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजता रस्त्यावर माकडीण आणि तिचे छोटे पिल्लू मृतावस्थेत पडल्याची माहिती हितज्योती आधार फाउंडेशनला मिळाली. माहिती मिळताच हितेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृत जीवांची विधिवत पूजा करून त्यांना सन्मानाने अंतिम निरोप देण्याची तयारी सुरू झाली.
मात्र, मृतदेह उचलण्याची वेळ येताच वातावरणच बदलले. आजूबाजूला असलेला बंदरांचा झुंड अचानक एकत्र आला. मोठमोठ्याने आवाज करत बंदरांनी पथकाच्या दिशेने धाव घेतली. मृत आई आणि तिच्या पिलाला आपल्यापासून दूर नेले जात असल्याचा जणू त्यांना अंदाज आला होता. पथकाने मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तसा बंदरांचा विरोध आणखी तीव्र झाला.
काही क्षणांसाठी हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकालाच प्रश्न पडला आपण ज्यांना ‘मूक प्राणी’ म्हणतो, त्यांच्याही मनात एवढ्या खोल भावना असतात का?
बंदरांच्या त्या आक्रोशात रागापेक्षा आपल्या साथीदारांना गमावल्याचे दुःख अधिक जाणवत होते. शेवटी पथकाने आवश्यक ती काळजी घेत मृतदेह तेथून हलवले.
हितज्योती आधार फाउंडेशनचे रोहित कश्यप, सुरवीर सिंह आणि साहेबाली अंसारी यांनी या कार्यात सहकार्य केले.
या घटनेने एक साधा पण मोठा संदेश दिला—रस्ते केवळ माणसांसाठी नाहीत. आपल्या आसपास जगणाऱ्या प्रत्येक जीवाचा त्या रस्त्यावर तितकाच हक्क आहे.
वेगात धावणाऱ्या वाहनामुळे काही सेकंदांत एखाद्या जीवाचं संपूर्ण जग उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा… कारण हे जीव बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही आपली माणसं असतात, त्यांनाही विरह होतो आणि त्यांनाही वेदना होतात.




