नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येते. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर मनीषा कोठे यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण केली. यावेळी मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, राजू दुबे, अग्निशमन विभागाचे राजेंद्र दुबे, सुनील डोकारे, केशव कोठे यांच्यासह मनपातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.


