नागपूर – शहरात गांजाच्या व्यसनामुळे चोरी करत फिरणाऱ्या एका सराईत चोराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला धंतोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी विवेकानंद नगरातील एका निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याच्या घरात चोरी केली होती. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत जवळपास साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या टोळीतील आणखी एक अल्पवयीन आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
विवेकानंद नगर परिसरात एअरफोर्समधून निवृत्त झालेले प्रवीण भास्कर राव हिंगनीकर राहत आहेत. २२ मे रोजी ते आपल्या पुण्यात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करत रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९ लाखांचा माल लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहरभरातील ३५ हून अधिक कॅमेरे तपासले गेले. यातून आरोपी विशाल पाटील याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या कुकडे लेआउट येथील घरावर धाड टाकली असता, विशाल तिथे मिळाला नाही, पण संपूर्ण चोरीचा माल तेथून हस्तगत करण्यात आला.
विशालचा वडील एक शासकीय कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून विशालला गांजाचे व्यसन आहे. यापूर्वी ते चंद्रपूरमध्ये राहत होते, तिथेही विशालने पाच चोरीच्या घटना केल्या होत्या. व्यसनमुळेच वडील नागपूरला स्थलांतरित झाले, मात्र येथेही विशालने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या केल्या.
चोरीनंतर विशाल आपल्या अल्पवयीन साथीदारांसह वर्धा येथे नातेवाईकांकडे पळून गेला होता. धंतोली पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यातील एक अल्पवयीन आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत २४ तासांतच चोरी उघडकीस आणून साडे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.









