नागपूर : नागपूरमधील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत थ धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्यासाठी विजेच्या डीपीला हात घातला आहे. पहिल्यांदा तो बचावला. पण दुसऱ्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.काशिनाथ कराडे, असे मृत पोलिसाचे नाव असून पोलिस लाइन स्थित पेन्शननगरमध्ये ही घटना घडली. ही घटना समोरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
माहितीनुसार,मृत पोलीस कर्मचारी पूर्वी लष्करात होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर २०१९ मध्ये ते पोलीस हवालदार म्हणून भरती झाले. सध्या ते पोलीस मुख्यालयात तैनात होते. रविवारी हवालदाराच्या घरात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. दुपारी दोनच्या सुमारास हवालदार काशिनाथ कराडे रामदेवबाबा मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या डीपीजवळ पोहोचले रागाच्या भरात त्यांनी डीपीमध्ये हात घातला. पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना डीपीमध्ये हात घातला. त्यानंतर ते जमिनीवर कोसळल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कौटुंबीक कारण आणि तणावातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.