विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’
नागपूर : नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस् सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्टला होणार असून येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.
१४ वर्षावरील व १४ वर्षाखालील अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ गायक कलावंतांनाही सहभागी होता येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील उदयोन्मुख व प्रतिभावंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. मागील वर्षी महापौर चषकांतर्गत अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. यावर्षी क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. गीत, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना यामाध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाच्या क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८८८८८९९३२१, ९७६४०२६३६५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
पत्रपरिषदेला सभापती नागेश सहारे यांच्यासह उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका दर्शनी धवड, लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान उपस्थित होते.