
मुंबई – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. शिंदे गटाचे महत्वाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी हालचाल घडणार असल्याचा त्यांचा दावा राजकीय तापमान वाढवणारा ठरत आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यातच सामंत यांनी माध्यमांशी बोलताना असा इशारा दिला की, विरोधी पक्षातील काही आमदार सध्या त्यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. “काही दिवसांत परिस्थिती अधिक स्पष्ट होईल,” असे त्यांनी सूचक विधान केले.
उदय सामंत यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही आमदार शिंदे गटाशी संवाद साधत आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीत काहीतरी मोठे बदल होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, उदय सामंत यांच्या आधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही असा दावा केला होता की, उद्धव ठाकरे यांच्या २० पैकी तब्बल १२ आमदार त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील २२ आमदार फुटतील असा दावा केल्यानंतर शिरसाट यांनी जोरदार पलटवार करत ही माहिती सार्वजनिक केली होती. तेव्हा त्यांनी इतकेही म्हटले होते की, योग्य वेळ आल्यावर ते त्या आमदारांची नावे जाहीर करतील.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली ही अदृश्य हालचाल लवकरच मोठा राजकीय भूकंप घडवू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय कोंदणात रंगू लागली आहे.









